*रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उत्साह*
*नितीन गडकरी यांची सावंतवाडीत जाहीर सभा*
सावंतवाडी:
कमळ निशाणीला मतदान करण्याची पहिल्यांदाच संधी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मिळत असल्याने, या दोन्ही जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा विजय हा निश्चितच आहे, किती फिगर पर्यंत पोहोचू, हे येत्या दोन-तीन दिवसात सांगेन असा विश्वास माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केला.
माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या जनसंपर्क कार्यालयात तेली यांची पत्रकार परिषद झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सिंधुदुर्गात ५ मेला जाहीर सभा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ही सभा सावंतवाडीत होण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मनसेचे राज ठाकरे यांची ४ मेला कणकवलीत जाहीर सभा होणार आहे.
विकासाचा अजेंडा घेऊन लोकांसमोर आम्ही जात आहोत, महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना प्रदीर्घ अनुभव आहे, ते मुख्यमंत्री होते, विविध खात्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणूनही त्यांनी अतिशय चांगले काम केले आहे. आता ते पुन्हा केंद्रात मंत्री होणार असल्याने, मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, रोजगाराचा प्रश्न आहे. हा प्रश्न उबाठा चे उमेदवार विनायक राऊत यांच्यामुळेच सुटला नाही. नारायण राणे यांनी रोजगार निर्मितीसाठी जिल्ह्यात सी वर्ल्ड प्रकल्प आणला होता, या प्रकल्पाला राऊत यांनी विरोध केला. असा आरोप तेली यांनी यावेळी केला.
ओरोस येथे वीस एकर जागेत टेक्निकल इन्स्टिट्यूट होणार आहे. राज्यात सत्ता बदलल्यानंतर ही जागा मिळाली, आचारसंहितेपूर्वी भूमिपूजनही झाले.
स्वतंत्र दोडामार्ग तालुक्याची निर्मिती ही राणे यांनीच केली, आडाळी एमआयडीसी ला चालना राणे यांच्यामुळेच मिळाली. यातून उतराई होण्यासाठी अवघा दोडामार्ग तालुका राणे यांना मतदान करण्यासाठी उत्सुक आहे. सोमवारी आपण दोडामार्ग दौऱ्यावर होतो, या तालुक्यात अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. दोडामार्गवासिय नारायण राणे यांना मतदान करण्यासाठी उत्सुक आहेत, तिनही विधानसभा मतदारसंघात राणे यांना मताधिक्य मिळेल असा विश्वास तेली यांनी व्यक्त केला.