ओटवणे येथील २० वर्षीय प्रज्वल पुनाजी पनासे या युवकाची भारतीय नेव्हीतील नौदलाच्या अग्निवीर एस एस आर पथकात निवड*
सावंतवाडी
आपल्याच वाडीतील यशस्वी युवकांचा आदर्श समोर ठेऊन त्यादृष्टीने स्वप्नपूर्तीला जिद्द आणि प्रयत्नाची जोड दिल्यास कोणतेही लक्ष गाठणे कठीण नाही हे ओटवणे येथील प्रज्वल पुनाजी पनासे या युवकाने दाखवून दिले आहे. देशसेवा बजावत असलेल्या आपल्या वाडीतील चौघांचा आदर्श घेऊन त्याप्रमाणे मार्गक्रमण केल्याने या अवघ्या २० वर्षीय युवकाची भारतीय नेव्हीतील नौदलाच्या अग्निवीर एस एस आर पथकात निवड झाली असुन लहानपणापासून भारतीय नौ दलात करिअर करून देशसेवा करण्याचे त्याचे स्वप्न साकार होत आहे.
मांडवफातरवाडीतील प्रज्वलचे प्राथमिक शिक्षण घरासमोरच्या शाळेत झाले. दहावी परीक्षेतही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केवळ जिद्द, इच्छाशक्ती आणि त्यादृष्टीने प्रयत्न केल्यानेच प्रज्वलने ओटवणे रवळनाथ विद्यामंदिर मधून ९२.२० टक्के गुण घेत तृतीय क्रमांक पटकाविला होता. त्यानंतर इयत्ता १२ वीमध्ये सावंतवाडीतील एस पी के कॉलेजमधील विज्ञान विभागातून ६२ % गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला. प्रज्वलचे लहानपणापासून भारतीय सैन्य दलात करिअर करून देशसेवा करण्याचे स्वप्न होते. त्यात प्रज्वलचा मोठा भाऊ प्रथमेश मर्चंट नेव्ही मध्ये मागील ८ वर्षे कार्यरत असून त्याचा आदर्श समोर ठेऊन इंडियन नेव्हीत देशसेवा करण्याच्या उद्देशाने सिग्मा करिअर अकॅडमीत प्रवेश घेतला. त्यानंतर या अकॅडमीच्या तत्त्व व मार्गदर्शनानुसार प्रज्वल पनासे भारतीय नौ दलाच्या भरतीमध्ये सहभागी झाला होता. मात्र या पहिल्या प्रयत्नात त्याला अपयश आले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात देशातील लाखो उमेदवारांमधून सर्वप्रथम लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, शारीरिक मोईजमाप ऑनलाइन परीक्षा, मैदानी परीक्षा, मेडिकल चाचणी, कागदपत्र पडताळणी अशा विविध प्रकारच्या चाचण्यांमध्ये प्रज्ज्वलने विशेष प्रावीण्य प्राप्त केल्याने त्याची भारतीय नौदलाच्या अग्निवीर एस एस आर पथकात निवड झाली.
काहीतरी वेगळाची इच्छाशक्ती आणि त्यादृष्टीने मेहनत व जिद्दीच्या जोरावर त्याची भारतीय नौ दलाच्या अग्निवीर एसएसआर पथकात निवड झाली आहे. भारतीय सैनिक दलात दोन वर्षांपूर्वी निवड झालेले मांडवफातरवाडीतील गणेश वर्णेकर, कृष्णा म्हापसेकर, निशा रेडकर, भारतीय वायुसेना दलाच्या स्पेशल ‘गरूड कमांडो’ पथकात निवड झालेला साबाजी पनासे, तसेच मर्चंट नेव्हीतील भाऊ प्रथमेश पनासे यांचा आदर्श समोर ठेऊन त्यांच्या प्रेरणेतून आपला इथपर्यंतचा प्रवास झाल्याचे प्रज्वल पनासे याने सांगितले. त्याच्या या निवडीमुळे आई-वडिलांसह पनासे कुटुंबियांच्या कष्टाचे चीज झाले असुन प्रज्वल पनासे याचे ओटवणे परिसरातून अभिनंदन होत आहे.
या सर्वांच्या सहकार्यामुळेच या देशाच्या महत्त्वाच्या सुरक्षा पथकात निवड होणे शक्य झाले अशा भावना प्रज्ज्वलने व्यक्त केली. तसेच आपल्या कुटुंबाच्या पाठबळामुळे आणि सहकारी मित्रांच्या सहकार्यामुळेच आपण हे यश मिळवल्याचे प्रज्ज्वल आवर्जून सांगत असून यापुढेही प्रयत्नांची पराकाष्टा करून भारतीय नौ दलासह पुढे वायुदलात मोठ्यात पदावर काम करत देशसेवा करण्याचे त्याचे स्वप्न आहे.
प्रज्वलच्या या यशात त्याचे काका ओटवणे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पनासे यांचे पाठबळ महत्वाचे ठरले. त्याच्या या स्वप्नवत प्रवासासाठी कष्टकरी आई सौ रुक्मिणी, मोलमजुरी करणारे वडील पूनाजी पनासे भाऊ प्रथमेश यांनी प्रोत्साहन दिले. प्रज्वलची मोठी बहीण प्रतीक्षा पनासे ही देखील वैद्यकीय क्षेत्रात मुंबई येथे कार्यरत असून तीचे मार्गदर्शन त्याला लाभले. लहान बहीण पूजा हिच्यासोबत देशसेवेसाठी प्रज्वल तयारी करत होता. पूजा हिची जिद्द पाहता ती ही लवकरच या क्षेत्रात येणार आहे. प्रज्वलला त्यांच्या मित्राचेही त्याला खंबीर पाठबळ मिळाले. मैदानी फिटनेससाठी त्याला ओटवणे मांडवफातरवाडी येथील व्यायाम शाळेचे सहकार्य लाभले. त्याच्या या यशात सिग्मा करियर अकॅडमीचे सर्व संचालक शिक्षक कर्मचारी वृंद यांचाही सहभाग आहे.
मांडवफातरवाडीतील सामाजिक व धार्मिक कामात अग्रेसर असलेला प्रज्वल आणि भजन कीर्तनच्या क्षेत्रात अव्व्ल आहे. शाळा तसेच हायस्कूलच्या शैक्षणिक व इतर उपक्रमात अग्रस्थानी असायचा. आई-वडिलांना शेती व घर कामात मदत करून त्याने आपल्या शिक्षण पूर्ण केले. तो उत्कृष्ट समालोचकही आहे. एस पी के कॉलेजमध्ये कबड्डी खेळामध्ये त्याने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशनचे शिक्षण सुरू असतानाच असताना नेव्हीमध्ये जाण्याचे त्याचे प्रयत्न सुरूच ठेवले होते. कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्यामुळे तसेच सर्वांच्या सहकार्यामुळे त्याचे देशसेवा करायच स्वप्नं पुर्ण होत आहे.
प्रज्ज्वल सध्या आय एन एसच्या चिल्का ओडिसा येथे एकूण ३१ आठवड्यांचे सैन्य प्रशिक्षण घेत आहे. या प्रशिक्षणात पहिले दहा आठवड्याचे खडतर बेसिक मिलिटरी ट्रेनिंग असून उर्वरित पुढील २१ आठवड्यांचे प्रशिक्षण त्याला भारतीय नौदलाच्या इतर प्रशिक्षण केंद्रात देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान रडार, सोनार किंवा कम्युनिकेशन्स तसेच क्षेपणास्त्रे, तोफा किंवा रॉकेट यांसारखी अग्निशस्त्रे चालवावी लागतात तसेच शक्तिशाली व आधुनिक जहाजे, विमानवाहू जहाजे, क्षेपणास्त्र विनाशक आणि फ्रिगेट्समध्ये ऑपरेट करणे याचे प्रशिक्षण दिले जाते. प्रज्वलला भविष्यात इंडियन एरफोर्सच्या गरुड आणि आर्मी भारतीय सैन्य दलाच्या पॅरा कमांडोससारखे नेव्हीच्या मार्कोस ‘या स्पेशल फोर्स युनिटमध्ये जाऊन देशसेवा करायची आहे.