You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा करिअर कट्टा कार्यशाळा संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा करिअर कट्टा कार्यशाळा संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा करिअर कट्टा कार्यशाळा संपन्न

वैभववाडी

सिंधुदुर्ग जिल्हा करिअर कट्टा विभागाची कार्यशाळा कणकवली महाविद्यालय कणकवली येथे २७ एप्रिल २०२४ रोजी संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयीन समन्वयक उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक मा. यशवंत शितोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ऑन जॉब ट्रेनिंग व इंटरशिप साठी करिअर कट्टा विभागाची भूमिका विषद केली. तसेच सर्व महाविद्यालयांनी सी. एस.आर.प्रोजेक्ट सादर करावेत व महाविद्यालयांना निधी मिळवून देण्यास व विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नवीन सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणीसाठी काही महाविद्यालयांची निवड करण्यात आली. कोकण कन्या योजनेअंतर्गत आणखी दोन महाविद्यालयांची लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली. सर्व महाविद्यालयांमध्ये खादी ग्रामोद्योग मार्फत मधुमक्षिका पालन प्रशिक्षण केंद्र उभा करण्यासाठी आवाहन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युवा कल्याण केंद्र उभा करणे साठी नियोजन करण्यात आले व त्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन कणकवली महाविद्यालय कणकवली करिअर कट्टा समन्वयक डॉ. बी.एल.राठोड व महाविद्यालयाचे प्राचार्य श्री युवराज महालिंगे यांनी यशस्वीपणे केले. सिंधुदुर्ग जिल्हासमन्वयक डॉ. अजित दिघे यांनी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या करियर कट्टा योजनांचा आढावा कार्यशाळेला दिला. सिंधुदुर्ग जिल्हा प्राचार्य प्रवर्तक डॉ. सी.एस.काकडे यांनी सर्व महाविद्यालयांमध्ये करिअर कट्टा प्रभावीपणे राबवण्यासाठी आवाहन केले. तसेच करिअर कट्टा विभागाच्या विविध योजनांचे महत्त्व सविस्तरपणे कार्यशाळेमध्ये मांडले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये करिअर कट्टा विभागाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी कार्यशाळेला अध्यक्षीय संबोधन केले. कार्यशाळेचे आभार प्रदर्शन प्रा. प्रवीण कडूकर व सूत्रसंचालन प्रा. सचिन दर्पे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा