वातावरणात आपल्याकडे गारवा आहे पण सगळ्यांची सकाळ झाली ती अजिंक्य रहाणेंच्या झुंजार खेळीनं. टीम इंडियानं पहिल्याच सत्रात दोन मोठे मोहरे गमावल्यामुळे कांगारू धक्का देण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर सगळी जबाबदारी आपल्या मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर आली. काल त्यानं सरसेनापती म्हणून कमाल केलीच होती पण आज त्याची बॅट काय करतेय हेही तेवढंच महत्वाचं होतं आणि हे झालं ही तसच. अजिंक्यनं झूंज सुरु ठेवली…! अजिंक्य रहाणेने 113 बॉलमध्ये दमदार अर्धशतक ठोकलं आहे आणि अजूनही तो ऑस्ट्रेलियन बोलर्सचा संयमाने सामना करतो आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर दुसरा कसोटी सामना खेळण्यात येतोय. हा बॉक्सिंग डे कसोटी सामना आहे. या कसोटी सामन्याचं नेतृत्व मराठमोठा खेळाडू अजिंक्य रहाणे करतोय. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत उर्वरित कसोटी सामन्यांच्या नेतृत्वाची जबाबदारी अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर आली आहे.
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची सरशी झाली. परंतु हीच कामगिरी पुढे काय ठेवण्यात भारतीय खेळाडूंना दुसऱ्या दवशीच्या पहिल्या सत्रात अपयश आले. सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाने भारताला दोन धक्के दिले. साहजिकच मॅचची संपूर्ण जबाबदारी कर्णधार म्हणून अजिंक्यवर पडली. संकटात सापडलेल्या टीम इंडियाला यातून बाहेर काढण्यासाठी अजिंक्य रहाणे ऑस्ट्रेलियन बोलर्सशी झुंजतो आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाची 36-1 अशी धावसंख्या होती. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाने सुरुवातीलाच भारताला दोन धक्के दिले आहेत. आज सकाळच्याच सत्रात शुभमन गिल 45 रन्सवर आऊट झाला तर चेतेश्वर पुजारा 17 रन्स करुन तंबूत परतला. हनुमा विहारीनेही संयमी खेळी करताना 66 बॉलमध्ये 21 रन्स केले. मात्र लायनने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढून स्मिथकरवी कॅचआऊट केलं.
दरम्यान, रहाणेने या दुसऱ्या कसोटीत आपल्या नेतृत्वाची चूणुक दाखवून दिली. तसेच रहाणेने योग्य वेळी योग्य निर्णय घेतले. रहाणेने आपल्याकडे असलेल्या गोलंदाजांचा योग्य आणि गरजेनुसार वापर केला. त्यामुळे पहिल्याच दिवशी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट करण्यास यश आले.