You are currently viewing आम्ही बोलत नाही, करून दाखवतो…

आम्ही बोलत नाही, करून दाखवतो…

“काही लोकांनी आम्हाला देखील वचन दिले आहे. परंतु आम्ही याबद्दल बोलत नाही, आम्ही ते करतो.” असं म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

“भाजपामध्ये गेलेले अनेकजण परत येण्याच्या तयारीत आहे. शिवाय, पुणे, पिंपरी – चिंचवड मधील काही नेत्यांना परत यायची इच्छा असून, लवकरच त्यांचे स्वागत केले जाईल.” असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना आगामी काळात भाजपाला धक्का बसण्याचे संकेत दिले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“जर कोणी अजितदादांना त्यांच्या पक्षात सहभागी होण्याचे वचन दिलं असेल, तर त्यांनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे. काही लोकांनी आम्हाला देखील वचन दिलं आहे. परंतु आम्ही याबद्दल बोलत नाही, आम्ही ते करतो. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या आणि शिवसेनेकडे गेलेल्या नेत्याचं आम्ही स्वागत केलं.” असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच, “अजित पवार जर इतरांच्या आमदारांबद्दल बोलत असतील तर त्यांच्यासोबतचे २८ आमदार का टिकले नाहीत? याचे त्यांनी उत्तर द्यावे. जर त्यांच्यासोबतचे २८ आमदारच टिकले नाहीत तर इतर पक्षांतील आमदार त्यांच्याकडे कसे येतील?” असा प्रश्न देखील चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा