तिलारी कालवा विभागाने तात्काळ पाण्याचा विसर्ग न वाढवल्यास कालव्यात बसून आंदोलन छेडणार – जावेद खतीब
बांदा
तिलारी धरणातून बांदा शहरात कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने याचा परिणाम शहरातील नळ पाणी योजनेवर झाला आहे, त्यामुळे तिलारी कालवा विभागाने तात्काळ पाण्याचा विसर्ग न वाढवल्यास कालव्यात बसून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी उपसरपंच जावेद खतीब यांनी दिला आहे.
वाढत्या पाण्याच्या मागण्यानुसार गोवा येथील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तिलारी शाखा कालव्यातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने बांदा शाखा कालव्यात सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे, त्यामुळे याचा परिणाम शहरातील नळ पाणी योजनेवर झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज श्री. खतीब यांनी कालव्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे.
तिलारीच्या बांदा शाखा कालव्यात डिसेंम्बर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नेतर्डे येथून पाणी सोडण्यात आले होते. यावर्षी पाणी लवकर सोडण्यात आल्याने कालव्याच्या ४२ किलोमीटर क्षेत्रात पाणी वेळेत पोहोचले. यामुळे पाणी जमिनीत मुरल्याने बांदा शहर व लाभ क्षेत्रातील विहिरीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली होती.
बांदा ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेला देखील याचा फायदा झाला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून कालव्यात सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग अचानक कमी करण्यात आला आहे. यामुळे स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पाण्याअभावी बांदा शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच पाणी नसल्याने या परिसरातील बागायती देखील करपून गेली आहे.