पत्रादेवी अपघातातील चालकाचाही गुरुवारी मृत्यू
अन्य तिघांची प्रकृती चिंताजनक
बांदा
पत्रादेवी चेकपोस्ट समोर बुधवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातातील जखमी चालकाचाही गुरुवारी सकाळी गोवा मेडिकल कॉलेज येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. राम तुकाराम बनकर (३४, रा उस्मानाबाद सध्या पुणे) असे त्याचे नाव आहे. यातील जखमी एक महिला, नऊ वर्षाच्या व तीन वर्षाच्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू आहेत. अन्य जखमींना गोमेकॉतुन डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती मोपा पोलिसांनी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुणे येथे नोकरी साठी असलेले बनसोडे आणि बनकर कुटुंब गोवा येथे इको गाडीने बुधवारी पर्यटनासाठी आले होते. यात चार मुले, तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश होता. एकदिवसीय पर्यटन आटोपून ते पुन्हा पुण्याच्या दिशेने बुधवारी सायंकाळी निघाले. पत्रादेवी चेकपोस्ट नजीक आल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी समोर चालणाऱ्या ट्रकवर धडकली. ही धडक एवढी मोठी होती की यात इको गाडीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. यात कांतीलाल विठ्ठल शिंदे हे जागीच ठार झाले. तर या गाडीचा चालक राम तुकाराम बनकर यांचा गोवा बांबोळी येथे गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अन्य जखमीवर गोवा मेडीकल कॉलेज येथे उपचार सुरू असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील जखमी कविता बनकर (वय ४०) यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर यातील नऊ वर्षाचा मुलगा आणि तीन वर्षाचा मुलगा याना सुद्धा डोक्याला दुखापत झाली असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. यातील एक महिला व अन्य जखमीना डिस्चार्ज देण्यात आला अधिक तपास गोवा पोलीस करीत आहेत.