जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना शस्त्रे जमा करण्यापासून सवलत!
आमदार वैभव नाईक यांनी वेधले होते जिल्हाधिकारी, पोलीसअधीक्षकांचे लक्ष
गुन्हा दाखल नसलेल्या परवानाधारकांना शस्त्रे जमा करण्यापासून सूट
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना शस्त्रे पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्याबाबत गेले काही दिवस प्रशासनाकडून देण्यात येणारा मनस्ताप आता बंद होणार आहे. कारण याबाबत आमदार वैभव नाईक यांनी नुकतीच पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांची भेट घेत या प्रश्नी लक्ष वेधले होते. तसेच याबाबत यापूर्वी त्यांनी विनाकारणी शस्त्रे जमा करण्यास सांगत परवानाधारकांना त्रास दिल्यास खपवून घेणार नाही असा इशारा देखील दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी किशोर तावडे व पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत अशा व्यक्तींच्या शेती संरक्षण परवानाधारक बंदुका जमा न करण्याबाबत ग्वाही दिल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. तसेच या परवानाधारकांनी संबंधित पोलीस स्टेशनला खुलासा सादर केल्यानंतर अशी शस्त्रे जमा करावी लागणार नसल्याचेही आमदार नाईक यांनी सांगितले. त्यामुळे सुरुवातीच्या काळात जमा केलेली शस्त्रे वगळता आता उर्वरित शस्त्र परवानाधारकांना आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे दिलासा मिळाला आहे.