You are currently viewing जनतेचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न – खा. विनायक राऊत

जनतेचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न – खा. विनायक राऊत

 

कणकवली :

कोकणी जनतेच्या आशीर्वादा मुळेच नगरसेवक, आमदार, खासदार ही पदे मी भूषविली. या सर्व पदांच्या माध्यमातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा येथील जनतेचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. आता पर्यंत १०७ खळा बैठका घेतल्या आहेत. जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

खासदारकीच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लावली. कोकणचा विकास आणि कोकणची प्रगती हाच माझा ध्यास आहे, असे प्रतिपादन खा.विनायक राऊत यांनी केले.

शिरवल येथे रविवारी खळा बैठकीत खासदार राऊत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कळसुली विभागाच्या वतीने निवडणुकीच्या प्रचारा निमित्त शिरवल येथे खळा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे,युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा भिसे, उपजिल्हाप्रमुख राजू राणे उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर, उपजिल्हा प्रमुख संदीप कदम तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके कळसुली विधानसभा प्रमुख चंदू परब, माजी तालुकाप्रमुख सचिन सावंत, शाखाप्रमुख प्रमोद सावंत शिरवल सरपंच गौरी वंजारे, उपसरपंच प्रवीण तांबे, शिरवल सोसायटीचे चेअरमन रविकांत सावंत, व्हाईस चेअरमन भाई कोदे आदी उपस्थित होते.

केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग खात्याचे कार्यालय आपल्या इमारतीत बसवून या खात्याचे मंत्री नारायण राणे हे महिना दीड लाख रूपये भाडे सरकारकडून घेत आहेत. म्हणजेच या खात्याचा महाराष्ट्रातील पहिला लाभार्थी स्वतः मंत्री राणे आहेत, अशी टीका खा.राऊत यांनी केली. याबाबत तूर्त आपण कोणतीही तक्रार केलेली नाही, तरी निवडणुकीनंतर याबाबत नरेंद्र मोदी यांना माहिती देणार असल्याचे खा. राऊत म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची आपली युती यापुढील निवडणुकांमध्येही अशीच कायम राहिल. या निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम करून इंडिया आघाडीचा उमेदवार विजयी करत काँग्रेसचा पंतप्रधान बसण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन खा.राऊत यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा