महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…
सावंतवाडी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात महाविकास आघाडीच्या वतीने आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली. दूरदृष्टी ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाज घटकांना न्याय देण्याचे काम या माध्यमातून केले. जगातील या सर्वश्रेष्ठ राज्यघटनेची आज पायमल्ली होत आहे. ती होता कामा नये. अशी भावना माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी व्यक्त केल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेली राज्यघटना बदलण्याचा घाट सध्या घातला जात आहे. त्यासाठी ४०० पार चा नारा दिला आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेली जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही आज धोक्यात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आज देशाला गरज आहे. आपल्या राज्यघटनेवरील लोकशाही वरील हा हल्ला परतवून लावण्यासाठी आपण सज्ज होऊयात. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला भारत संविधानाने दिलेल्या मार्गाने उभा करूयात.
यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, जिल्हा बॅक माजी संचालक विकास सावंत, ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख रूपेश राऊळ, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहर अध्यक्ष देवा टेमकर, शहर अध्यक्ष सायली दुभाषी, युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर, सोशल मिडीया फ्रंट चे जिल्हाध्यक्ष संजय भाईप, विद्यार्थी तालुकाध्यक्ष ऋतिक परब, युवती कुडाळ तालुका अध्यक्ष स्वाती पालयेकर, युवती उपाध्यक्षा राधीका धुरी, सरचिटणीस विषाखा नाईक आदी उपस्थित होते.