*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*
*श्री गजानन विजय ग्रंथ*
अध्याय चौदावा
ऐका नर्मदा आख्यान
चवदाव्या अध्यायात
स्नान नर्मदा महिमा
चला ओंकारेश्वरात ||
श्रींना आग्रह भक्तांनी
केला साथ चलण्याचा
माता नर्मदा सन्निध
नको हट्ट ओंकाराचा ||
येता तुम्हा समवेत
घडे कांहीं विपरीत
वृथा दोष नको आम्हा
वदे समर्थ त्वरीत ||
पर्वासाठी गर्दी झाली
गेले भक्त दर्शनाला
महाराज पद्मासनी
कांठी बैसे चिंतनाला ||
रस्त्यावर गर्दी झाली
नदीमार्गे जावे आता
श्रीही चढले नावेत
दाखवली तत्परता ||
एका खडकावरी हो
नर्मदेच्या मध्यंतरी
आदळली वेगे नाव
फळी फुटली सत्वरी ||
पाणी नावेत येताच
उड्या टाकती नावाडी
शांत “श्री” पण भक्तांना
भिती भरे हुडहुडी ||
कांठी माजे हाहाकार
मेली ही पांच माणसे
पाणी नदीला अथांग
भरवसा त्यांचा नसे ||
कासावीस भक्त श्रींना
वारंवार विनवती
मानू वचन आपुले
सोडवावे या आपत्ती ||
महाराज वदे भक्ता
नका होऊ हो हैराण
लावी न धक्का नर्मदा
केले अपार स्तवन ||
प्रगटली रेवा जली
हात लाविला छिद्राला
झाले निचरा हो पाणी
नांव लागली कांठाला ||
बाईमुळे वाचे प्राण
कोण कुठल्या आपण?
विचारती भक्तजन
करा सगळे कथन ||
कन्या ओंकार कोळ्याची
माझे रूप आहे नीर
सांगे ओळख नर्मदा
ओली राही निरंतर ||
नमस्कार गजानना
झाली नाहीशी जलांत
जाणा अधिकार श्रींचा
रूजे गोष्ट ही मनात ||
सौ.मंजिरी अनसिंगकर
नागपूर.