सावंतवाडीच्या गंजीफा, लाकडी खेळणी’ यांसाठी भौगोलिक (जीआय) मानांकन प्राप्त
नरेंद्र मोदींना ‘गंजीफा’ देणार भेट : युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले
सावंतवाडी :
ऐतिहासिक सावंतवाडी लॅकरवेअर्स यांच्या ‘गंजीफा’ या कलेसाठी व सावंतवाडीती सुप्रसिद्ध ‘लाकडी खेळणी’ यांसाठी भौगोलिक (जीआय) मानांकन प्राप्त झालं आहे अशी माहिती सावंतवाडी राजघराण्याचे राजेसाहेब खेमसावंत भोंसले व राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांनी दिली.मेक इन इंडियाच्या माध्यमातून हस्तकलांना प्रोत्साहन देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘गंजीफा’ भेट स्वरूपात देणार असल्याच युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले म्हणाल्या. तर सावंतवाडीत गंजीफाच म्युझिअम व्हावं अशी राजमाता स्व. सत्वशीलादेवींची इच्छा होती त्यासाठी आपण प्रयत्नशील आहे असं युवराज लखमराजे भोंसले यांनी सांगितले. राजवाडा येथील पत्रकार परिषदेप्रसंगी युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, अँड. समीक्षा दाभाडे आदी उपस्थित होते.
भारत सकराकडून सावंतवाडी लॅकरवेअर्स यांच्या ‘गंजीफा’ या कलेसाठी व सावंतवाडीती सुप्रसिद्ध ‘लाकडी खेळणी’ यांसाठी भौगोलिक (जीआय) मानांकन प्रदान करण्यात आलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भौगोलिक मानांकन मिळण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी सावंतवाडी गंजिफा कार्ड व खेळण्यांना जीआय नामांकन मिळालं आहे. सिंधुदुर्गसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. तर रोजगासाठी देखील हे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे असं मत अँड समीक्षा दाभाडे यांनी व्यक्त केलं.
राणीसाहेब सौ.शुभदादेवी म्हणाल्या, गंजीफा म्हणजे खजिना, या गंजीफा कार्डवर विष्णूचे दहा अवतार आहेत. १७ व्या शतकात गंजीफा सावंतवाडीत आला. खेमसावंत तिसरे यांच्या काळात कलेला प्रोत्साहन दिलं गेलं. तदनंतर राजेसाहेब शिवरामराजे व राजमाता सत्वशीलादेवी यांनी ही कला जोपासली. पुंडलिक चितारी यांच्या माध्यमातून ही कला पुढील पिढीपर्यंत पोहचवली. नव्या पिढीला ही कला शिकवली. आजही गंजीफा राजवाड्यात तयार केला जातो. ही परंपरा युवराज लखमराजे व श्रद्धाराजे पुढे घेऊन जातील असा विश्वास आहे. आजच जीआय मानांकन मिळण्यासाठी आमच्या गंजीफा कलावंतांच देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. नवीन कलावंत देखील पुढे येत आहेत. शासनानं या कलेसाठी व कलावंतांसाठी हितकारक योजना सुरु केल्यास आणखीन कलाकार पुढे येतील अस मत राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, गंजीफाला जीआय मानांकन मिळालं ही सावंतवाडीसाठी गौरवास्पद बाब आहे. ही कला जोपासण्यासाठी २५ कलाकार कार्यरत असून १२५ कलाकार कसे तयार होतील यासाठी आमचा प्रयत्न आहे. गंजीफामध्ये १४ प्रकार सावंतवाडीत आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला गंजीफा पोहोचला आहे. देशातील स्मार्ट सीटीत गंजीफा आहे. ही कला अजून पुढे घेऊन जायची आहे. तर मेक इन इंडियाच्या माध्यमातून हस्तकलांना प्रोत्साहन देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सावंतवाडीचा हा गंजीफा भेट स्वरूपात द्यायचं आहे असं युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले म्हणाल्या. तर राजमात सत्वशीलादेवी यांची इच्छा होती की गंजीफा म्युझिअम सावंतवाडीत व्हावं. त्यादृष्टीने आमचा प्रयत्न असणार आहे. शासनाकडून त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या कलेला जीआय मानांकन मिळाल्यामुळे निश्चितच हे स्वप्न साकार होईल असा विश्वास युवराज लखमराजे भोंसले यांनी व्यक्त केला.
यावेळी राजेसाहेब खेमसावंत भोंसले म्हणाले, राजेसाहेब शिवरामराजे व राजमाता सत्वशीलादेवी यांनी या कलेसाठी व त्या टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. नवीन पिढीला गंजिफा खेळ कळेल यासाठी आमचा अधीक प्रयत्न असतो. जीआय मानांकन मिळाल्यामुळे निश्चितच त्यात अधिक भर पडेल. चितारआळी बाजारपेठ लाकडी खेळणी आजही बनत आहेत. नवी पिढी देखील राजवाड्यात गंजीफा बनवत आहेत. यावेळी गंजिफा कलाकार मोहन कुलकर्णी, लाडू ठाकूर, रामचंद्र ठाकूर, सदाशिव धुरी, पांडुरंग धुरी, सचिन कुलकर्णी, वर्षा लोंढे, गायत्री कुलकर्णी, प्रज्ञा पांचाळ, संगिता कुंभार, आत्माराम नार्वेकर, सोनाली कुंभार, सुकन्या पवार, प्रेरणा वाडकर, आर्या देवरूखकर, वेदीका गावडे, संजना कदम, निकिता आराबेकर, सिताराम गवस, परशुराम मेस्त्री, मधुकर सोनावडेकर आदी उपस्थित होते.