You are currently viewing माणसे घडविणारा डॉक्टर : मोहनदास गाडबैल

माणसे घडविणारा डॉक्टर : मोहनदास गाडबैल

 

माणसांच्या आजारावर इलाज करणारे भरपूर डॉक्टर आहेत. परंतु माणसाच्या मानसिक आजारावर किंवा तो आजार होऊ नये म्हणून त्याची काळजी घेणारा तसेच त्यासाठी नियमितपणे काम करणारा डॉक्टर म्हणून डॉक्टर मोहनदास गाडबैल यांचा माझा परिचय आहे .डॉक्टर मोहनदास हे मूळचे अमरावतीचे. अमरावतीच्या सुप्रसिद्ध अशा अंबादेवी मंदिराच्या रोडवर त्यांचा दवाखाना आहे .पण या माणसाने जे यश संपादन केलेले आहे ते निश्चितच नोंदणीय आहे. डॉक्टर म्हटला म्हणजे पैसा आला आणि पैसा आला की साहजिकच आपला कल तो खर्च करण्याकडे होतोच. मग डॉक्टर लोक मंगल कार्यालय बांधतात. फार्म हाऊस बांधतात आणि परदेश वाऱ्या करतात. या डॉक्टरांनी पैसा मिळवला आहेच .पण त्या पैशाचा विनियोग त्यांनी उडान नावाची सामाजिक संस्था स्थापन करून केलेला आहे .या उडानने आजपर्यंत हजारो लोकांना जीवदान दिलेले आहे. या माणसाने मंगल कार्यालय बांधले नाही. पण अतिशय सुसज्ज अद्यायावत वातानुकूलित एक मेडिटेशन व प्रशिक्षण हॉल बांधला .साधारणपणे सत्तर लोक बसू शकतील इतक्या कॅपॅसिटीचा .अमरावतीच्या अंबादेवी रोड वरील त्यांचे हे मेडिटेशन सेंटर महाराष्ट्रात सर्वदूर पसरले. लोकांनी इथे यायचं. मेडिटेशन करायचं आणि आपल्या मनातील व्याधींना घालवायचं .खर म्हणजे हे त्यांचे काम रामदेवबाबांच्या आधी सुरू आहे .रामदेव बाबा तर नंतर आले .पण याचा गाजावाजा नाही. फारशी जाहिरात नाही आणि फारशी फी पण नाही. योगायोगाने त्यांच्या मदतीला आमचे मित्र प्राध्यापक मिलिंद पत्रे हे आले. मिलिंद पत्रांनी उडानची जबाबदारी स्वीकारली .मेडिटेशनचे वेगवेगळे कोर्स तयार केले. नाममात्र फी ठेवली. मेडिटेशनचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी अमरावतीच्या सांस्कृतिक भवनमध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतले. याशिवाय अमरावतीकरांना नव्हे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना सात चांगल्या सवयी शिकविण्याचा प्रयत्न केला .मला डॉक्टर साहेबांचा हा गुण खूपच महत्त्वाचा वाटतो .अमरावतीच्या लोकांना जर सात चांगल्या सवयी लागल्या तर अमरावतीच्या खऱ्या अर्थाने विकास झाल्याशिवाय राहणार नाही मला असं वाटते. अशा प्रकारचा प्रयोग करणारा हा माझ्या माहितीतील पहिला डॉक्टर आहे .डॉक्टरांचे संवाद कौशल्य अप्रतिम आहे. त्यांच्या बोलण्याने अर्धा आजार दूर होतो आणि अर्धा आजार त्यांच्या होमिओपॅथीच्या पांढऱ्या गोळ्यांनी. सामाजिक जाणीव असलेला हा माणूस आता अमरावती पुरता मर्यादित राहिलेला नाही तर अमरावती बरोबर नागपूर पुणे मुंबई सारख्या शहरांमध्येही त्यांनी आपल्या सेवा देणे प्रारंभ केलेले आहे. नागपूरला देखील त्यांचे मोठे मेडिटेशन सेंटर आहे .मला ते म्हणाले काठोळे तुमचे मिशन आयएएस या सेंटरमध्ये सुरू करा. तुम्हाला लागेल ती मदत करतो .डॉक्टरांच्या हृदयामध्ये पेशंट विषयी करुणा तर आहेत पण त्याचबरोबर सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांविषयी एक सामाजिक बांधिलकी आहे. मला आठवते . आमचा एक कार्यक्रम अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भावनांमध्ये मी व मिलिंद पत्रे सरांनी आयोजित केला होता .पाहुण्यांपैकी एक डॉक्टरसाहेब होते .हे नागपूरवरुन उशिरा आले. कार्यक्रम संपल्यानंतर सगळ आवर सावर करताना ते म्हणाले. आता पुढचा कार्यक्रम काय आहे ? म्हटलं सर्वांनी घरी जायचे आहे . ते म्हणाले जेवण ? तुमचे एवढे कार्यकर्ते आहेत हे कुठे जाणार .मी म्हटले घरी जाऊन जेवण करणार. डॉक्टर साहेब म्हणाले आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांनी दिवसभर परिश्रम केलेले आहेत .चला मी या सर्व कार्यकर्त्यांना माझ्यातर्फे जेवण देतो आणि त्या सर्व आमच्या 25 -30 कार्यकर्त्यांना घेऊन ते अमरावतीतल्या सर्वात मोठ्या हॉटेलमध्ये गेले आणि सर्वांना पोटभर जेवू घातले .असा हा सर्वसामान्य कार्यकर्त्याची जाण असलेला माणूस .आज आपल्या असामान्य कर्तृत्वामुळे पुण्या मुंबईसारख्या शहराला गवसणी घालून अमरावतीचे नाव लौकिक वाढवित आहे .डॉक्टर साहेबांनी अमरावती करांना सेवन हॅबिट्स व मेडिटेशनची अलौकिक देणगी दिलेली आहे. ती निश्चितच अवर्णनीय अद्वितीय व नागरिकांना खरा मार्ग दाखवणारी आहे.

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा