You are currently viewing निवडणूक प्रशिक्षण जबाबदारीने घेण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांचे आवाहन

निवडणूक प्रशिक्षण जबाबदारीने घेण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांचे आवाहन

कुडाळ :

 

निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान अधिकाऱ्यांनी काय करावे आणि काय करू नये, या सूचनांचा काटेकोर अभ्यास करावा. त्यादृष्टीने सर्वांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. त्यासाठी निवडणूक प्रशिक्षण जबाबदारीने घेण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाद्वारे विविधस्तरीय कार्यवाही सातत्याने व योग्य प्रकारे करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून मतदान प्रक्रियेमध्ये थेट सहभागी असणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष-मतदान अधिकारी यांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण सावंतवाडी आणि कुडाळ येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृह तसेच कुडाळ येथे प्रशिक्षणासाठी उपस्थित झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांशी निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी भेट देऊन संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी व अपेक्षाही जाणून घेतल्या. प्रशिक्षणानंतर त्यांनी सावंतवाडी येथील स्ट्राँग रुमची देखील पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (सावंतवाडी) हेमंत निकम, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी, दोडामार्ग तहसीलदार अमोल पोवार, अपर तहसीलदार मोनिका कांबळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (कुडाळ) ऐश्वर्या काळुसे, कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे आणि मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. सिंह म्हणाले, ‘‘आपल्यावर असलेली जबाबदारी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यादृष्टीने आवश्यक असलेल्या सर्व बाबी, पूरक साहित्य, त्याचा वापर, मतदान केंद्रावर घ्यावयाची आवश्यक खबरदारी या सर्व बाबी गतिमानतेने, अचूकपणे पार पाडण्याची जबाबदारी मतदान केंद्रातील अधिकारी, कर्मचारी यांची आहे. आपल्याला दिलेली जबाबदारी आणि काम अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्याच्या भूमिकेतून सर्वांनी या प्रशिक्षण कार्यक्रमांचा उपयोग करून घ्यावा. प्रशिक्षणादरम्यान आपल्या मनात येणाऱ्या सर्व शंका व प्रश्न आपल्या प्रशिक्षकांना मनमोकळेपणाने विचारा आणि त्यांचे निराकरण करून घ्या.’’

प्रतिक्रिया व्यक्त करा