बंदूक बाळगल्या प्रकरणी दोघांवर कारवाई
देवगड :
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने विनापरवाना गैरकायदा बंदूक ताब्यात ठेवून लपून ठेवल्या प्रकरणी तळवडे येथील दोघांवर कारवाई करून त्यांच्या जवळील काडतूस बंदूक व जिवंत काडतुस जप्त केले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने केलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. ही कारवाई गुरुवार ४ एप्रिल रोजी तळवडे लाडवाडी येथे दोन ठिकाणी करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला माहिती मिळतात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथकाने विनापरवाना गैरकायदा बंदूक बाळगणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई करीत मुद्देमाल हस्तगत केला.स्थानिक अन्वेषण विभागाने तळवडे लाडवाडी येथे दोन ठिकाणी छापा टाकत कारवाई केली. गुरुवार ४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी रमेश दत्ताराम लाड (७०) राहणार तळवडे लाडवाडी यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या लाकडाच्या ढिगाऱ्याखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीमध्ये २० हजार रुपये किमतीची काडतुस बंदूक व १६ हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस लपून ठेवलेल्या स्थितीत मिळाले. या प्रकरणी रमेश लाड यांच्याविरुद्ध बिगरपरवाना गैर कायदा बंदूक जवळ बाळगून ती लपून ठेवल्याप्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३,२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद राजेंद्र गोविंद जामसंडेकर पोलीस हवालदार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग यांनी दिली .
अशाच प्रकारे तळवडे लाडवाडी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि दुसरी कारवाई केली असून तेथीलच अजिंक्य महादेव राऊत यांच्या आंबा बागेतील मांगराच्या पाठीमागील गवताच्या ठिगाऱ्याखाली २० हजार रुपये किमतीची काडतुशी बंदूक लपवून ठेवलेल्या स्थितीत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली असून ती जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ बापू कोयंडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अजिंक्य राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र शेळके, पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले,राजेंद्र जामसंडेकर, श्रेया गवस, आशिष गंगावणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल खंडे, स्वाती सावंत ,एएसआय गुरुनाथ कोयंडे आदींनी ही कारवाई केली. प्रकरणाचा पुढील तपास देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर करीत आहेत.