पुणे महापालिकेच्या हद्दवाढीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून महापालिका क्षेत्राला लागून असलेल्या 23 गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने अखेर घेतला आहे. बुधवारी याबाबतची अधिसूचना राज्य सरकारने प्रसिद्ध केली. २३ गावांचा नव्याने समावेश झाल्याने पुणे हे मुंबईला मागे टाकत राज्यातील सर्वात मोठे शहर बनले आहे. मुंबई शहराचे क्षेत्रफळ हे सुमारे ४४० चौरस किलोमीटर असून, त्यापेक्षा पुण्याचे क्षेत्र हे वाढणार असल्याने पुणे हे आता ‘महापुणे’ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे भविष्यकाळात पुणे ही राज्यातील सर्वाधिक मोठी महापालिका ठरणार आहे.
२३ गावे समाविष्ट झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेची हद्द जवळपास ४८५ चौरस किलोमीटर होईल, तर मुंबई महानगरपालिकेची हद्द सुमारे ४४० चौरस किलोमीटर आहे. नव्याने समाविष्ट गावांपैकी तीन गावांची ग्रामपंचायत निवडणूक घेण्यास विरोध करणारी याचिका हायकोर्टाने मंगळवारी फेटाळली होती. त्यानंतर सरकारने अवघ्या २४ तासांत ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची अधिसूचना काढली. प्रशासनाच्या अंदाजानुसार, ही गावे समाविष्ट झाल्यानंतर महापालिकेची हद्द ४८५ चौरस किलोमीटर, तर महसूल विभागाच्या दाव्यानुसार महापालिकेची हद्द ५१६ चौरस किलोमीटर होणार आहे.
नव्या २३ गावांच्या समावेशाने पुण्याचे क्षेत्रफळ ४८५ चौरस किलोमीटर होणार आहे. त्यामुळे मुंबईला मागे टाकत पुणे हे आकाराच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी महापालिका होणार आहे.