*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*१४) माझे गाव कापडणे…*
(विधीलिखित)
नमस्कार मंडळी,
मागच्या लेखात विधीलिखितावरून बऱ्याच गोष्टी आठवल्या मला. जो जे नशिब घेऊन येतो तशी त्याची वाटचाल होते हे खरे असले तरी मनगटाच्या बळावर नशिब घडवणारे असामी काही कमी नाहीत जगात! त्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. पण काही काही व्यक्तिंच्या नशिबी फारच खडतर जीवन येते हे ही खरेच आहे. मला एकदम तिसरी चौथीचा वर्ग असावा कदाचित तो आठवतो.
आठवले की फार वाईट वाटते मला.
आमच्या झेंड्याच्या गल्लीत थोडे अलिकडे डावीकडच्या गल्लीत एक प्राथमिक शिक्षिका, मला वाटते माहेरी रहायच्या त्या. आम्ही खूप लहान होतो, नाव वगैरे आठवणे आता शक्य नाहीच, पण ती घटना आता एवढे वय झाले तरी मनावर ठसली आहे. जखम भरून आलीच नाही म्हणाल तरी चालेल. कारण बालमन फार संवेदनशील असते. बालपणीच्या घटना मनावर खोल परिणाम करणाऱ्या ठरतात. त्या माहेरवाशिण शिक्षिका माहेरी का रहात होत्या माहित नाही पण, आमच्याच वर्गात त्यांची लहान बहिणही शिकायला होती तिच्या बाबत त्या इतक्या निष्ठूर का होत्या याचा विचार करता आजही मला त्याचा उलगडा होत नाही.
भर वर्गात सर्वांसमोर त्या तिला अक्षरश: लाथा बुक्क्यांनी तुडवायच्या. साऱ्या आम्ही मुली असहायपणे त्या मुलीचे रडणे व मारखाणे बघत असायचो. ती त्यांची बहिण, नि त्या शिक्षिका? आम्ही भेदरून गंमत बघणाऱ्या काय बोलणार? विशेष म्हणजे आता वाटते आजूबाजुच्या शिक्षिकाही बघत असणारंच ना? मग त्या पैकी मध्ये कोणी का पडले नाही?
बरे हा सीन जवळपास दररोजचाच होता तरी कोणाला दया येत नव्हती का? आणि त्या मुलीचे आईवडिल? त्यांना हे माहित नव्हते का? ते का कानाडोळा करत होते? अक्षरश: अंगात संचारल्या सारखे त्या मारायच्या व पुन्हा दुसऱ्या दिवशी मुलगी वर्गात हजर? वाटते मी त्या जागी असते तर कितीही वाईटपणा घेऊन मी त्या मारकुट्या बाईंचे दोन्ही हात नक्कीच पकडले असते? किंवा त्या बाईंना काही मानसिक आजार आहे का? म्हणून त्या बेफामपणे मारतात ह्याचा शोध घेतला असता.
आजूबाजुच्या लोकांना कोणी कुणाला इतके मारते आहे हे पाहून काहीच फरक पडू नये ? इतके लोक निष्ठूर असतात का? मला तर प्रश्नच प्रश्न पडतात कारण मी जिथे जिथे भांडण दिसले तिथे तिथे साम दाम दंड भेद वापरून ते मिटवले आहे, मला हे प्रकार बिलकुल बघवत नाहीत.असो. पुढे काय झाले माहित नाही.
पूर्वी शिक्षक मारायचे, पण इतके अमानुष? आमचे एकनाथ गुरुजीही मारायला अमानुषच होते, तिथे ही आमची बोलती बंद व्हायची पण एक दिवस दिगंबरला असा काही रूळ मारला की, कधी नव्हे ते पालक वर्गात आले. पूर्वी पालक अशा कारणासाठी कधीही वर्गात येत नसत.”छडी लागे छम छम, विद्या येई घम घम” असा समज होता समाजाचा. बाकीचे छान छान शिक्षकही आठवतात. कठोर करडे शिक्षकही बरेच होते. शिस्ती पुरतेच माणसाने कठोर असावे. अशा माराने मुले शाळेत न येता मग बाहेर भटकतात व त्यांचे आयुष्याचे नुकसान होते. आणि इतक्या लहान वयात मुलांना काय कळते हो? प्रेमाने मुलांना लवकर जिंकता येते.
आमच्या एक शिक्षिका इतक्या चांगल्या होत्या की रात्री अभ्यासाला त्यांच्याकडे जाऊन तिथेच आम्ही कधी कधी झोपत असू. त्या गाणी पण शिकवायच्या. अजून सहावीची गाण्याची वही माझ्याकडे आहे. आणि आमच्या पी टी च्या टिचर तर खूपच छान होत्या. आमची धुळ्याच्या नकाणा तलावावर सहल गेली होती, तेव्हा त्यांच्या तांग्याच्या मागे धावणाऱ्या आम्ही, मधून मधून तांग्यात आलटून पालटून बसवायच्या. तलाव परिसरात तेव्हा प्रचंड झाडी होती. व त्यात आमच्या बाईंनी स्वयंपाक केला होता. एका जुन्या धुळ्यात राहणाऱ्या बाईंकडेच आमचा सहलीच्या मुलींचा मुक्काम होता. कसे चांगले लोक होते पहा. एक तरूणपणी विधवा झालेल्या काळ्या सावळ्या, नऊवार नेसणाऱ्या टापटिपीच्या अवघ्या तिशीच्या बाई होत्या. म्हैसूरपाक त्या काळी त्या घरी छान करायच्या. त्या ब्लाऊज ही छान शिवायच्या. चांगल्या गोष्टी जास्त मनात राहतात.
तेव्हा पासून मी ठरवते आहे, (वास्तविक आता रे सी पी ही मिळते) म्हैसूरपाक घरी करू पण अजून काही महुर्त लागला नाही पहा. अशा एकेक आठवणी मनाच्या तळाशी दडलेल्या असतात पहा. आता ही त्या बाई, त्यांची ती टापटीप व्यवस्थित अंबाडा अजून मनात घर करून आहे. त्या काळी विधवांना असे एकटे राहणे किती अवघड होते हे आपल्याला चांगले माहित आहे. तेव्हा मात्र हे काही कळत नव्हते. पण कुणी ही कुटुंबिय त्यांच्या बरोबर नव्हते म्हणजे त्यांची ही काहीतरी मजबुरी असणार हे नक्की! त्या काळच्या चालीरीती पाहिल्या तर अशी दुसऱ्या गावी नोकरी करणारी बाई तर अगदी विरळा…! कुणावरही असा प्रसंग न येवो. पण तेही का आपल्या हातात आहे?
दर्जा जवळच्या शाळेत एक हेडमास्तरीण बाई थोड्या स्थूल व बुटक्या अशा होत्या. त्यांना आम्ही फार घाबरायचो. पण त्या मुलींना म्हणायच्या तुमच्या घरून पिठाचा कोंडा घेऊन या. तेव्हा सगळे त्यांना हसत असत. कोंडा आणून देत व हसत. पण आपण जो कोंडा जो पिठ गाळून फेकून देतो ते फायबर त्या खायच्या. हे फायबर खाल्ले पाहिजे हे त्यांना त्या काळात उमगले होते जे आज आम्हाला कळते आहे, आहे की नाही मज्जा! ह्याच करड्या हेडमास्तर बाईंच्या काळात एक प्रथा सुरू झाली होती ती म्हणजे रोज पेपर मधील एक दोन बातम्या लिहून आणून प्रार्थनेच्या वेळी त्या वाचून दाखवायच्या. आणि हे संकट नेमके माझ्यावरच कोसळले कारण पेपर फक्त आमच्या घरीच येत असत. काय बातम्या निवडाच्या, काही अक्कल नव्हती पण वाचून तर दाखवायच्यात. माहित नाही मी काय लिहून न्यायची व वाचायची ते देवच जाणे!
पण मी प्रार्थने समोर पेपर वाचतांना आजही मला स्पष्ट दिसते. बहुतेक ॲक्सिडेंटच्याच बातम्या वाचत अरणार! कारण इतक्या लहान वयात काय वाचून समोर ठेवायचे हे कसे कळणार? आणि मला सांगणार कोण? म्हणून मग धडधडत्या अंत:करणाने जमेल ते वाचून दाखवायचे!
पण या पेपर वाचनाने माझी वाचनाची पाया भरणी केली हे माझ्या फार उशिरा लक्षात आले. घरी नियमित पेपर येत असल्यामुळे मला दररोज पेपर वाचायची सवय लागली, इतकी की ती माझ्या अंगवळणी पडून मी दररोज पेपर वाचू लागले. व्हिएटनाम युद्ध कोरिया युद्ध वाचल्याचे मला आठवते. इंदिरा गांधी नभोवाणी मंत्री झाल्याचा पेपरमधील नऊवारीतील त्यांचा फोटोही आठवतो. म्हणजे एक साधी सवय मला जीवनात बरेच काही देऊन गेली म्हटले तरी चालेल. तिथून मी पुस्तकांकडे वळले व खूप वाचू लागले इतकी की आज तुमच्याशी बोलू लागले. त्यामुळे मी अगदी खुश आहे. तुम्ही पण खुश आहात ना?
धन्यवाद मंडळी…भेटू पुढच्या रविवारी.
जय हिंद .. जय महाराष्ट्र….
आपलीच,
प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)