लोकसभा निवडणूक संदर्भात नोडल अधिकाऱ्यांची बैठक संपन्न
सर्व यंत्रणांनी आपआपसात समन्वयन ठेवुन जबाबदारी पार पाडावी – जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे
सिंधुदुर्गनगरी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नोडल अधिकारी म्हणून निवडणूकीच्या विविध टप्प्यांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. प्रत्येक नोडल अधिकाऱ्यानी समन्वय ठेवून दिलेल्या जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूकविषयक नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी श्री. तावडे बोलत होते. पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, स्वीपचे नोडल अधिकारी उदय पाटील, तसेच नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आढावा बैठकीमध्ये प्रत्येक नोडल अधिकारी यांनी निवडणूक तयारीसंदर्भात माहिती दिली. यामध्ये स्वीप नोडल अधिकारी यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर निवडणूक खर्च समिती, प्रसारमाध्यम सनियंत्रण व प्रमाणिकरण समिती, आचारसंहिता कक्ष, भरारी पथक, नामनिर्देशन पथक, पोस्टल बॅलेट तसेच इतर नोडल अधिकारी यांनी निवडणूक पुर्वतयारीसंदर्भात माहिती दिली.
जिल्हाधिकारी श्री. तावडे म्हणाले की, निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक हा कालबध्द कार्यक्रम असून रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे प्रत्येकाने निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. सर्व विभागानी समन्वय साधून निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणूक संदर्भातील कामे सुनियोजित पद्धतीने पार पाडावी. यासाठी संबंधित विभागासोबत सतत संपर्कात रहावे असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. तावडे यांनी यावेळी दिले.
मार्गदर्शक सुचनेनुसार शस्त्र जमा करण्याचे निर्देश-
निवडणूक मुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने गृह विभागाच्या २० सप्टेंबर २०१४ च्या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनेनुसार गुन्हे दाखल असणाऱ्या शस्त्र परवानाधानकांनी निवडणूक कालावधीमध्ये आपल्याकडील शस्त्र जमा करणे बंधनकारक आहे. यासंदर्भात जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली 19 मार्च रोजी छाननी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पोलिस अधीक्षकांनी गुन्हे दाखल असलेल्या 129 शस्त्र परवानाधारकांची यादी समितीसमोर सादर केली. या समितीमध्ये जिल्ह्यातील पोलीस स्टेशननिहाय गुन्हे दाखल असलेल्या 129 शस्त्र परवानाधारकांचे (सिंधुदुर्गनगरी -07, देवगड -2, विजयदुर्ग 6, मालवण 19, आचरा 02, सावंतवाडी 22, बांदा 08, वेंगुर्ला 05, वैभववाडी 08, दोडामार्ग 08, कणकवली 20, कुडाळ 22) शस्त्र जमा (अनामत) करणेबाबत छाननी समितीमध्ये निर्णय घेण्यात आला. 2019 मध्ये पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये देखील अशा प्रकारची प्रक्रीया करण्यात आलेली होती.
वर नमुद 129 शस्त्र परवानाधारक वगळता इतर शेती संरक्षण शस्त्र परवानाधारक (3195) व आत्म संरक्षण शस्त्र परवानाधारक (1065) असे एकूण 4260 शस्त्र परवानाधारकांना त्यांच्या ताब्यात असणारे शस्त्र लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 प्रक्रीया पूर्ण होई पर्यंत संबंधित पोलिस ठाणे येथे का जमा (अनामत ) करण्यात येवू नये याबाबत खुलासा घेण्याच्या नोटीसा जारी करण्यात आलेल्या आहेत. खुलासा प्राप्त होताच छाननी समितीमध्ये पुढील निर्णय घेण्यात येईल.