देशात निष्पक्ष निवडणुकिसाठी काँग्रेसवर होत असलेली कारवाई थांबवा – जिल्हा काँग्रेसची मागणी
निवडणूक आयोग प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…
ओरोस
देशात निष्पक्ष निवडणुका होण्यासाठी काँग्रेस पक्षावर आयकर विभागामार्फत होत असलेली कारवाई ताबडतोब थांबविण्यासाठी निवडणूक आयोगाने तातडीने हस्तक्षेप करावा. अशी मागणी जिल्हा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
काँग्रेस पक्ष हा नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष आहे. नोंदणीकृत पक्षाला आयकरात सूट देण्यात आली आहे. असे असताना काहीतरी खोटे-नाटे कारण दाखवून ऐन निवडणुकीच्या काळात १८२३ कोटीचा दंड ठोठावून तसेच काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती गोठवून आयकर विभागा मार्फत देशातील भाजपप्रणीत सरकार या देशामध्ये निष्पक्ष निवडणूक होऊ नयेत, असा प्रयत्न करत आहे. हा प्रकार म्हणजे कुस्तीच्या खेळात एका स्पर्धकाचे हात बांधून दुसऱ्याचे हात मोकळे असलेल्या स्पर्धकाबरोबर कुस्ती खेळण्यास सांगण्यासारखे आहे. ज्या न्यायाने काँग्रेसला दंड ठोठावण्यात आला आहे त्याच न्यायाने भाजपच्या आर्थिक विवरणाचा विचार केल्यास सुमारे ४५०० कोटीचा दंड भाजप पक्षावर ठोठवावा लागेल, परंतू फक्त काँग्रेस पक्षाची ऐन निवडणुकीच्या काळात आर्थिक कोंडी करून भाजप अनितीने लोकसभा निवडणुका जिंकू पहात आहे.
हा देशातील लोकशाहीचा खून आहे. निष्पक्ष निवडणूका घेणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. तरी देशात निष्पक्ष निवडणूका होण्यासाठी काँग्रेस पक्षावर आयकर विभागामार्फत होत असलेली कारवाई ताबडतोब थांबविण्यासाठी निवडणूक आयोगाने तातडीने हस्तक्षेप करावा. अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तर हे निवेदन मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे पाठवावे अशी विनंती करण्यात आली आहे.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, प्रदेश प्रतिनिधी साईनाथ चव्हाण, आमदार सुभाष चव्हाण, नागेश मोरये, अजिंक्य गावडे, प्रवीण वरुणकर,आसावरी गावडे, महेश परब,अरविंद मोंडकर, गणेश पाडगावकर, संदेश कोयंडे,सुगंधा साटम, आदि पदाधिकारी उपस्थित होते.