*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी मोहन जोशी यांनी केलेलं पुस्तक परीक्षण*
*मराठी ग्रामीण कादंबरी, “उगम आणि विकास”*
✒️लेखिका: वृंदा कौजलगीकर
वृंदा कौजलगीकर या एक अतिशय मनस्वी लेखिका आहेत. त्यांच लेखन वास्तव दर्शी असून समाजातील विविध घटनेचे, घटकांचे प्रतिबिंब त्यात उमटताना आपल्याला दिसते. त्या मराठीच्या प्राध्यापिका होत्या त्यामुळे मराठी ग्रामिण साहित्यातील कादंबरीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी पीएचडी सारख्या अत्यंत चिकित्सक अभ्यासाची कास धरली. पण मराठी कादंब-यांचा आवाका आणि मूळं इतकी खोलवर रुजलेली आहेत की प्रबंध सादर करताना आपण फोकसड् असणं फार गरजेच आहे हे त्यांच्या लक्षात आलं. केवळ ग्रामीण कादंबरीच विश्वही खूपच विस्तारलेल आहे त्यामुळेच नेमकेपणाचा विचार करुन १९६० नंतरच्या ग्रामीण कादंबरीला न्याय द्यावा अस त्यांनी ठरवलं.
ललित लेखन, ग्रामीण कथा लिहिण्याची सवय त्यांना असल्याने त्यांनी पीएचडीचा अभ्यास आणि प्रबंध लेखन समर्थपण पेललं इतकेच नाही तर डाँक्टरेटही मिळवली. पण हे सगळ करणं साध सोप मुळीच नव्हतं.
संसार, मुलांच्या करियरची सुरवात, घरी लग्नकार्य, नोकरी, लोकलचा प्रवास या सगळ्या अडचणींच्या शर्यतीत जिद्द जिंकली आणि पीएचडीच्या प्रबंधावर आधारित *मराठी ग्रामीण कादंबरी उगम आणि विकास* हा भला मोठा ग्रंथ त्यांनी वाचकांना अर्पण केला. हा ग्रंथ फक्त वाचकांचीच साहित्यिक भूक भागवत नाही तर पीएचडीच्या अभ्यासकांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य करणारा आहे.
या प्रबंधरुपी पुस्तकात तेवीस ग्रामीण कादंब-यांचा समावेश आहे. या सर्व कादंब-यांचा सांगोपांग आणि सर्वार्थाने सखोल विचार झाला आहे हे आपल्याला वाचताना लक्षात येते.
पुस्तकात ग्रामीण कादंबरीचे कथानक आणि व्यक्तिचित्रणं हे अतिशय काटेकोरपणे विस्तारित स्वरूपात लिहीली गेली आहेत. तसेच मुख्य घटक, घटना, प्रसंग, संवाद, संघर्ष, वातावरण, निवेदनशैली, भाषाशैली, शीर्षक, इ. अतिशय सविस्तरपणे नोंदवून त्या,त्या भागाचे निष्कर्ष ही हळूवारपणे नमूद केले आहेत. सोबत ग्रंथसंदर्भही दिले आहेत जेणे करुन अभ्यासक विद्यार्थ्यांना तत्सम अभ्यासात सहजता यावी, संदर्भ मिळणे सोपे जावे.
लेखिकेची भाषाशैली उत्कृष्ठ आहे. बोलीभाषेतील मतमतांतरे, ग्रामीण साहित्याची भाषा, तिथला निसर्ग आणि त्याचा ग्रामीण जीवनावर होणारा परिणाम, ग्रामीण साहित्याची पाश्र्वभूमी, ग्रामीण साहित्यावर घेतले जाणारे आक्षेप, ग्रामीण कादंबरीच्या विकासाचे टप्पे इत्यादी ग्रामीण कादंबरीचे अनेक कंगोरे या पुस्तकात लेखिकेने अत्यंत ताकदीने उलगडले आहेत की ते वाचताना वाचक गुंतुन पडतो.
तहानभूक हरपून जाते.
चुकार-गणेश आवटे,
झोंबी-आनंद यादव, मेड इन इंडिया-पुरूषोत्तम बोरकर,
रानखळगी-भीमराव वाघचौरे,
गोतावळा-आनंद यादव,
हाल्या हाल्या दूधू दे- बाबाराव मुसळे, अशा अनेक कादंब-यांचे जणू पुस्तकात संमेलनच भरले आहे असे वाटते. किंबहूना या पुस्तकात प्रत्येक ग्रामीण कादंबरीचा अर्थ, आशय, तंत्र या अनेक अंगानी विचार केला आहे. तर वावटळ- व्यंकटेश माडगूळकर, ताम्रपट-रंगनाथ पाठरे या राजकीय घडामोडींवर आधारित कथानक असणाऱ्या कादंब-यांचाही समावेश या पुस्तकात असून लेखिकेने अतिशय समर्पकतेने प्रत्येक कादंबरीला न्याय दिला आहे.
व्यक्तीचित्रणात्मक, नायकप्रधान, नायिकाप्रधान, प्राध्यापक नायक असलेली कादंबरी अशा अनेक पैलूचा केलेला अभ्यास या पुस्तकात उद्रुत झाला आहे. १९६० ते १९८९ कालावधीतील ग्रामीण कादंबरीचा अभ्यास समजून घेताना आपल्याला लेखिकेने कुशलतेने संदर्भासहित ग्रामीण जीवनाची सफर घडवून आणली आहे. ग्रामीण कादंबरी ही शेती, पाऊसपाणी, स्त्रीजीवन, गावातलं राजकारण या पैलू भोवती फिरते. मात्र कथानकात विविधता पुष्कळ आहे असे लेखिका डाँ.वृंदा कौजलगिकर म्हणतात.
मि.सुभाष कौजलगिकरांना कृतज्ञता पूर्वक अर्पण केलेल्या या पुस्तकास मा.वामन देशपांडे यांची अत्यंत सुंदर प्रस्तावना लाभली आहे. तर मार्गदर्शक डॉ. भास्कर गिरधारी यांचाही त्या कृतज्ञता पूर्वक उल्लेख करायला विसरत नाहीत.
मृदुल प्रकाशन डोंबिवली यांनी प्रकाशित केलेल्या प्रबंध पुस्तकाला संग्रह ग्रंथ म्हणून मूल्य प्राप्त झाले आहे. हे पुस्तक वाचल तर २३ कादंब-या रसग्रहणासहित वाचल्याच समाधान मिळतं. वाचकांनी अवश्य वाचावं अस हे पुस्तक *मराठी ग्रामीण कादंबरी, उगम आणि विकास*
लेखिका..डॉ. वृंदा कौजलगिकर
सौ.मानसी मोहन जोशी