– उपआयुक्त विनयकुमार आवटे
सिंधुदुर्गनगरी
माननीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना (PMKISAN ) अंतर्गत देशातील 9 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना रुपये 18000/- कोटीचे थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत निधी वितरण कार्यक्रम दिनांक 25 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12.00 वाजता. आयोजीत करण्यात आला असल्याची माहिती कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुण्याचे उपआयुक्त कृषि गणना तथा पथक प्रमुख पी.एम.किसान,विनयकुमार आवटे यांनी दिली.
केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी, कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे व त्याद्वारे कृषी उत्पन्न वाढवणे यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबियांस प्रत्येक 4 महिन्याला रुपये 2000 प्रति हप्ता याप्रमाणे एक वर्षात 3 समान हप्त्यात रुपये 6000/-प्रति वर्ष लाभ देय आहे.
राज्यात महसूल , कृषी व ग्राम विकास विभागाकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत गावपातळीवर पात्र शेतकरी कुटुंबाचे निश्चितीकरण करून त्यांना लाभ देण्यात येतो. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या पी एम किसान पोर्टल वर फार्मर कॉर्नर अंतर्गत नवीन लाभार्थ्यांना थेट नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे . नोंदणी करताना शेतकऱ्यांचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, राज्य, लिंग, प्रवर्ग, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व इतर तपशील, मोबाईल क्रमांक व जन्मतारीख इत्यादी तपशील नोंदवला जातो. पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतर लाभ योजनेद्वारे निधी जमा होतो. महाराष्ट्र राज्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत 6 हप्ते वितरीत करण्यात आले असून दिनांक 24 डिसेंबर 2020 अखेर एकूण रु. 9491.38 कोटी रक्कम 102.31 लाख लाभार्थी शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात आली आहे .तसेच दिनांक 1 डिसेंबर 2020 ते दिनांक 31 मार्च 2021 या कालावधीकरिता रुपये 2000/- प्रति लाभार्थी नुसार सातवा हप्ता देय आहे. त्यातील रक्कम वितरित करण्यात येत आहे . यासाठी दिनांक 25 डिसेंबर 2020 रोजी माननीय पंतप्रधान यांच्या शुभहस्ते दुपारी 12.00 वाजता हा लाभ वितरीत करण्याचा कार्यक्रम होणार असून याद्वारे देशातील जवळपास 9 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना रुपये 18000/- कोटी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतर होणार आहेत.या कार्यक्रमाचे थेट प्रसारण (लाइव्ह प्रक्षेपण) राष्ट्रीय दूरचित्रवाहिनीवर तसेच ऑनलाइन http://pmindiawebcast.nic.in/ या लिंक वर होणार आहे.या कार्यक्रमात राज्यातील प्रत्येक गाव, तालुका, जिल्हा स्तरावर पी एम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना सहभागी करून कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे. कोविड- 2019 च्या पार्श्वभूमीवर तसेच काही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता विचारात घेऊन हे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सर्वांना सुचित केले आहे. तरी राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन, उपआयुक्त कृषि गणना तथा पथक प्रमुख पी.एम. किसान, विनयकुमार आवटे यांनी केले आहे.