You are currently viewing महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब

महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब

महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब

दिल्ली

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी (ता. २३) रात्री दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.

जवळपास दीड सुरू असलेल्या या बैठकीत अखेर महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

लोकभा निवडणूक जाहीर होताच भाजपने महाराष्ट्रातील २० लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, ही यादी जाहीर करून बराच कालावधी उलटला तरी महायुतीच्या जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे जागावाटप कधी होणार? असा प्रश्न तिन्ही पक्षातील नेत्यांना पडला होता.

त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मनसे देखील महायुतीत सहभागी होणार अशा चर्चा सुरू झाल्या. मनसे महायुतीसोबत आल्यास त्यांना किती जागा मिळणार? याकडे देखील अनेकांचं लक्ष लागून होतं. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अखेर महायुतीचा जागावाटपाचा तिढा सोडवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ३०-१३-०४-०१ असा असणार आहे. भाजप हा महायुतीत मोठा भाऊ असल्याने त्यांना लोकसभेच्या ३० जागा मिळणार आहे. त्यापाठोपाठ शिंदे गटाला १३ जागा, अजित पवार गटाला ४ जागा आणि राज ठाकरे यांच्या मनसेला १ जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मनसेला दक्षिण मुंबईतील जागा मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. बैठकीतील महत्वाची बाब म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जरी लोकसभेच्या १३ जागा मिळणार असल्या, तरी यातील ५ ते ६ जागांवरील नवीन उमेदवार देण्यात यावेत, अशी चर्चाही झाली आहे. त्यामुळे शिंदे गटातून नेमकं कुणाचं तिकीट कापलं जाणार? याकडेही सर्वाचं लक्ष लागून आहे.

दरम्यान, आज भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती आहे.या यादीत महाराष्ट्रातील काही उमेदवारांच्या नावांचा देखील समावेश असणार आहे. पहिल्या टप्प्यातील भाजपच्या वाट्याला असलेल्या भंडारा गोंदिया आणि गडचिरोली मतदार संघाचे उमेदवार आज जाहीर होणार, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा