प्रियंका गांधींचं रस्त्यावरच ठिय्या आंदोलन; दिल्ली पोलिसांनी रोखला काँग्रेसचा मोर्चा
नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरुच आहे. काँग्रेसनेही या मुद्द्यावरुन मोदी सरकारला घेरण्याची तयारी सुरु केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी आणि नवे कायदे मागे घेण्याची मागणी करत मोर्चा काढला जाणार होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा रोखला. यामुळे काँग्रेस नेत्यांनी १० जनपथ येथे रस्त्यावरच ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. यावेळी प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. पोलिसांनी कारवाई करत ठिय्या आंदोलन करणाऱ्या प्रियंका गांधींसह इतर काँग्रेस नेत्यांना हटवलं असून ताब्यात घेतलं.
प्रियंका गांधी यांनी आंदोलनावेळी प्रसारमाध्यांशी बोलताना पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकार दिशाभूल करु शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. “या सरकारविरोधात असणारे कोणतेही मतभेद दहशतवादाचे घटक असल्याचं सांगितलं जात,” असल्याची टीका त्यांनी केली आहे.
“काँग्रेस नेत्यांना राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तीन नेते राष्ट्रपतींची भेट घेऊ शकतात”, अशी माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त दीपक यादव यांनी दिली. दरम्यान राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्याआधी काँग्रेस मुख्यालयाबाहेर १४४ कलम लागू करण्यात आलं होतं.