इन्सुली-परबवाडी तिलारी कालव्याच्या पोट कालव्यात मातीचा भराव…
तात्काळ पाण्याचा मार्ग मोकळा करा, ग्रामस्थांची मागणी…
बांदा:
तिलारी कालव्याच्या पोट कालव्यात मातीचा भराव आल्याने इन्सुली परबवाडी येथील ग्रामस्थांना तिलारी कालव्याचे पाणी पोहचत नाही आहे. इन्सुली तिलारी कालव्याला पाणी येऊन महिना उलटला तरी अद्याप त्यांना तिलारीचे पाणी न पोहचल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर लवकरात लवकर या पोट कालव्यात अडकलेली माती दुर करून पाण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.
एक महिन्यापूर्वी इन्सुली येथील कालव्याला तिलारी धरणाचे पाणी पोहचले त्यामुळे येथील शेतकऱ्यांमधुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे. येथील परबवाडी येथे राईशेळ परिसरातून तिलारी कालव्याच्या पोट कालवा गेला आहे. सदरची वाडी उंचावर असल्याने त्या भागातील लोकांना कालव्याच्या पाण्याचा लाभ घेता येईल त्यासाठी लाखो रुपये खर्च करून हा कालवा तयार करण्यात आला होता
मात्र आता तिलारी कालव्या पाणी येऊन एक महिना उलटला तरी या भागातील लोकांना अद्याप पाणी पोहचले नाही. तिलारीने तयार केलेल्या पोट कालव्यामध्ये ठीक ठिकाणी मातीचा भराव आल्याने पुढे पाणी जात नसल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे येथील कालव्यात अडकलेला भराव दूर करावा अशी मागणी होत आहे तसे न झाल्यास येथील शेती साठी लागणारे पाणी व पिण्याच्या पाण्याची गैरसोय होईल असे ग्रामस्थांनी सांगितले.