*ज्येष्ठ कवयित्री मंगला मधुकर रोकडे यांचा प्रकाशित कविता संग्रह मांगल्याचा झरा मधील अप्रतिम काव्यरचना*
*बात एकच सांगते*
काय हवे होळी तुला
पाचोळ्याचे घे पैंजण
सळसळ सुळसुळ
ऐक स्वरांचे गूंजन॥धृ॥
समर्पित होता होता
जणु फेडतेही ॠण
गाते जशी का कोकिळा
गमे मधूर ती धून॥१॥
वृक्ष वल्लरी जीवन
नको जाऊस घेऊन
जीवनाचं वरदान
नको लावू उधळून॥२॥
तुझे होतसे स्वागत
पुरणाच्या पोळीतून
गोडी पुरणाची जाते
तुझ्या ज्वालेत जळून॥३॥
सांग लागते का गोड
तुझ्या सवे करपून
सरपण ही जाते ग
तुझ्या साठीच संपून॥४॥
बात एकच सांगते
दोन्ही हात जुळवून
घास गरिबा मुखीचा
नको घेऊ हिरावून॥५॥
*–निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*
एरंडोल, जळगाव