You are currently viewing मला आवडलेलं नाटक…

मला आवडलेलं नाटक…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*मला आवडलेलं नाटक…*

 

१९६९ ला आम्ही नाशिकला आलो. वय वर्षे २४ व २० फक्त. एस वाय बी ए फक्त झालेलं होतं.

नवं कॅालेज नवी नोकरी, जीवनानुभव शून्य.झटापटीचे झगडण्याचे दिवस होते. पण काही संकट वगैरे वाटत नव्हते. मी पी डी एफ वाय पासूनच प्रचंड वाचत होते. तोच सिलसिला अजून चालू होता. कारण फक्त रेडिओ होता, टी व्ही नव्हते, मोबाईल तर अलिकडचा.

मग, मनोरंजन म्हणजे सिनेमा नि नाटक. त्या

काळी सिनेमेही दर्जेदार, सामाजिक आशय व विषय असलेले, व दोन दोन वर्षे थिएटरला

चालणारे असत. व नाटके? वा! क्या बात है..

नाटकांची मोठीच क्रेझ होती समाजात! आणि

नाटककार तर किती महान होते! एकेक नाव

म्हणजे चंद्रसूर्यच जणू? कानेटकर, शिरवाडकर, तेंडुलकर एकाहून एक दिग्गज नावे या क्षेत्रात होती. नट अभिनेते तर किती महान होते हो? डॅा.लागू, भट साहेब, सतिश दुभाषी, पु ल देशपांडे दादा कोंडके वसंत सबनिस कित्ती नावे घ्यावीत हो? आमच्या

नाशिकच्या कानेटकरांच्या नाटकांनी तर इतिहास घडवला. चित्तरंजन कोल्हटकर, घाणेकर,पणशीकर अशी नाटककार व अभिनेत्यांची हिमालयाची उंची होती.सारे काही दर्जेदार व दर्दी लोकांचे राज्य होते.अभिनयाचा एवढा कस लागत असे की

त्या भुमिकेत एकरूप झाल्यामुळे नाटक सोडावे लागत होते. लालन सारंग यांनी

“रथचक्र” नाटकाची भुमिका त्यामुळेच सोडली, असे जीव ओतणारे अभिनेते असल्यामुळे एकेका नाटकाचे खूप प्रयोग होत

असत. दौरे खूप चालत. भक्ति बर्वे रीमा लागू

अलिकडच्या वंदना गुप्ते रोहिणी हट्टंगडी किती

महान अभिनेत्री आहेत ह्या!

 

अशा काळात ती प्रशंसनिय नाटके बघण्याची

एक वेगळीच क्रेझ होती.”आम्ही नाटकाला

चाललोय् सांगण्यातही गर्व वाटायचा! पुण्यात

तर थेटरात मोगऱ्याचा घमघमाट असे. गजरा माळल्या शिवाय बायका नाटकाला जात नसत. व हौशी मंडळी हातात गजरे बांधत असत. कधीच नाटक फ्लॅाप जात नसे. दौरे करून मंडळी कंटाळत. दिवसाला तीन प्रयोग

सुद्धा हाऊसफुल्ल होत असत.मग सांगा अशी

नाटके कोण पाहणार नाही?

 

वास्तविक त्या काळात रिक्षा ही नव्हत्या. आणि पैसे ही नव्हते हो? तरी दर्दी मंडळी नाटकाला जात असत. मग आम्ही पण १९७३

ला शिरवाडकरांचे”नट सम्राट” पाहिले, डॅा.

लागू व शांता जोग यांची भुमिका असलेले.

डॅा. लागू..! वाह वा..काय बोलावे साहेबांन् विषयी! अभिनय करावा? नाही हो, अभिनय जगावा तर त्यांनीच! भुमिकेत शिरणे,

परकाया प्रवेश म्हणजे काय असतो हे त्यांच्या

भुमिका पाहूनच कळू शकते. त्यांच्या तोडिसतोड मोहन आगाशे गिरीश ओक संजय

मोने अशी बरीच नावे आहेत.

 

नट सम्राट बघितले(१९७३) नि सारे थिएटर सुन्न झाले. घर देता का घर? अहो या वादळाला कुणी घर देतं का? काय वेदना आहे

लागूंच्या चेहऱ्यावर? भुमिकेत शिरायचे म्हणजे

किती हो? त्यांचे ते हरवलेपण पाहून वेड लागते

माणसाला!

“टू बी ॲार नॅाट टू बी, दॅट इज द क्वेश्चन?”

केवढं मोठ्ठं स्वगत आहे हो? त्यांची ती संवाद

फेक.. नाही दुसऱ्या कुणात येऊच शकत नाही!

ज्यांना सर्वस्व अर्पण केलं ती पोटची पोरंच

हरामखोर निघाल्याचं जे दु:ख आहे, ते अभिनयातून दाखवणं सोपं का आहे? ती किमया फक्त श्रीराम लागू नावाचा अभिनेताच

करू शकतो.खरंच, उगीच नाही ही माणसं अजरामर होत?अस्सल मोत्याचं पाणी म्हणजे

काय असतं ते त्यांच्या भुमिका पाहूनच कळतं

येरा गबाळ्याचं काम नाही हो ते! तेथे पाहिजे

जातीचेच!

 

आज ही ही अजरामर कलाकृती लोक आवडीने बघतात. विषय तसा जुनाच आहे

पण या अभिनेत्यांच्या अभिनयाने त्याला अशा

काही उंचीवर नेऊन ठेवलाय् की तो कधीच

खाली येणार नाही. सतिष दुभाषींचे “

बेकेट” ही (रूपांतरीत नाटक) त्याच काळात

आम्ही पाहिलं. पण ते परदेशी सेट व वातावरण काही आपल्याला मानवत नाही.

ती संस्कृतीच वेगळी आहे. असो.नट सम्राटने

खरंच इतिहास घडवला आहे, यात वादच नाही.

शांता जोग ही तोडिसतोड. सरकार, अहो सरकार म्हणून लागू साद घालतात. आपण

आता मोरवाडीला आपल्या घरी जाऊ या,

सरकार म्हणतात, पण …

 

नाटक एकदा बघायला हवे हो.. बघणार ना मग?

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा