*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*
*मी, माझं? का आपण आपलं?*
प्रेमात पडल्यावर माणसाला आजूबाजूचं भान रहात नाही,हे खरंय का?तो आपल्या प्रिय व्यक्तीला उत्तमातली उत्तम भेटवस्तू देतो. प्रेमाची कबुली,शपथ दिली घेतली जाते.हॉटेल्स, रेस्टॉरंट,मॉल्स,बागा, समुद्र किनारे जिथं मिळेल तिथे प्रेमाचे ताटवे फुललेले दिसतात.जर एखाद्या व्यक्तीला आपण मनापासून आपलं मानलं असेल, त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारले असेल तर असं व्हायलाच पाहिजे ना की द्वेष,मत्सर मुळातूनच जायला हवेत. आणि जे अॉलरेडी आपलेच आहेत त्यांच्यावरचं प्रेमही वाढायला हवं ना ? मग ते एकदम शत्रूच का बरं वाटावेत? पण होतं काय की,घरी फ्रेश होऊन, मेकअप करून, चांगले कपडे घालून,डिओ मारून इंप्रेशन पाडणं सोपं आहे. कारण यात फक्त चांगली बाजूच आपण दाखवतो आणि आपल्यालाही दिसते. आणि जेव्हा २४×७ त्या व्यक्तीबरोबर प्रपंचाच्या जबाबदाऱ्या सांभाळत रहावं लागतं तेव्हा खऱ्या प्रेमाचा कस लागतो. मग रात्री कुणाच्या घोरण्याच्या आवाजामुळे दुसऱ्याच्या झोपेची पार वाट लागू शकते.एरवी अप टू डेट असलेल्या त्याला सकाळच्या वेळी टॉवेल कमरेला गुंडाळून ब्रश करताना बघणं कदाचित बेंगरुळ वाटू शकतं.आणि तीसुद्धा कायम मेकअप मधे चकाचक, हसतमुख राहणारी घरी अस्ताव्यस्त ढगळ्या गाऊन मधे केसांचा बुचडा नैतर उलटे केस फिरवून क्लचर लावलेली दिसल्यावर कशी छान वाटेल? त्यात तिची कामाची विभागणी, चिडचिड…कटकटच वाटेल ना.मग तिच्यातली प्रेयसी शोधून सापडणार नाही.म्हणजे जोपर्यंत आपण बॅचलर लाईफ मधे असतो तोपर्यंत सगळं जगच सुंदर,गुडी गुडी असतं. कारण त्यावेळी घराची जबाबदारी आपले आई-वडील सांभाळत असतात. पण ती जबाबदारी पेलण्याची वेळ जेव्हा आपल्यावर येते तेव्हा खरी मजा कळते. घरातलं नियोजन आत्तापर्यंत सगळे वडीलधारी करत होते तेव्हा त्यांच्या चुका दिसत होत्या, उद्धटपणांना त्यांना बोललं जात होतं. मागच्या पिढीचे म्हणून हिणवलं गेलं. पण हा विचार आपण कधी केला का की त्यांना सुद्धा एकमेकांना समजून घ्यायला बोलायला मन रमवायला थोडा निवांत ‘आपला वेळ’ हवा होता पण मिळू शकला नाही? त्यांच्या आयुष्यात सुद्धा किती फेब्रुवारीतले व्हॅलेंटाईन डे येऊन गेले पण सासू-सासर्यांची काळजी, मुलांच्या जबाबदाऱ्या, पैसा पाण्याची चिंता यातून एकमेकांसाठी कधी त्यांना वेळच मिळाला नाही. त्यांना स्वतःचं नातं कधी फुलवायलाच मिळालं नाही. कितीतरी गोष्टी मनातल्या मनातच राहून गेल्या असतील ज्या कधी सांगताच आल्या नाहीत. कारण मोकळेपणानं बोलता यावं असा हक्काचा कोपराच त्यावेळी नव्हता. आणि तरीही त्यांनी एकमेकांकडे नुसतं बघितलं तरी मनातलं कळत होतं. भले छोट्या जागेत मोकळेपणा नव्हता पण स्वतःमधील प्रियकर आणि प्रेयसी त्यांनी मरू दिली नाही. त्यांची स्पेस किती सहजपणे त्यांनी इतरांच्या सोयीसाठी देऊन टाकली. मनाची काय कमी कुतरओढ झाली असेल का? कदाचित शरीराची सुद्धा झाली असेल. पण तेच जर त्यांनी मी माझं, माझ्या पुरतं अशी भूमिका घेतली असती तर आज आपल्यासाठी आपल्या मागे जी भक्कम खंबीर सपोर्ट सिस्टीम उभी आहे ती राहिली नसती. हे प्रेम आहे, हे भान आहे, हा विश्वास आहे! आणि म्हणूनच ते आजही खुश आहेत. कृतार्थ आहेत. खरे व्हॅलेंटाईन तर आपले आई-वडीलच आहेत एकमेकांचे आणि आपलेही! त्यांनी आय लव यू म्हटलं असेल किंवा नसेलही पण त्याचं दिखाऊ प्रदर्शन नक्कीच केलं नाही आणि म्हणूनच असं वाटतं की ते वरवरचं मुळीच नव्हतं… नाही. बायको झाल्यावर सुद्धा मैत्रीण किंवा त्याहीपुढे जाऊन मी म्हणेन की प्रेयसी जपता येणं हे खरं प्रेम. मग त्यानंतर जबाबदारी,त्याग,समर्पण या गोष्टींना कुठल्याच कोंदणाची गरज उरत नाही. हेच तर त्यांनी शिकवलं की मी माझं नसतंच कधी ठेवायचं दोघांच्यात; ठेवायचं ते फक्त आपण,आपलं! बरोबर आहे ना?
सौ.अंजली दीक्षित-पंडित
९८३४६७९५९६
छत्रपती संभाजीनगर