वैभववाडीत ‘जाणता राजा’ महानाट्य : शेवटच्या दिवशी शो हाऊसफुल्ल.
आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
वैभववाडी
‘जाणता राजा’ महानाट्य पाहण्यासाठी तिसऱ्या दिवशी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली. आमदार नितेश राणे यांनी देखील कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. तहसीलदार सूर्यकांत पाटील, नायब तहसीलदार श्री. पाटील व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. वैभववाडी तालुक्यातील नाधवडे या ठिकाणी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले. जाणता राजा महानाट्य पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक व इतिहास प्रेमींनी तिनही प्रयोगाला मोठी गर्दी केली. बुधवारी प्रयोगाच्या अखेरच्या दिवशी शो हाऊसफुल्ल ठरला. जवळपास सात ते आठ हजार प्रेक्षक उपस्थित होते. प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी नाटक पाहण्यासाठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे नियोजन प्रशासनाच्या वतीने नियोजनबद्ध करण्यात आले. या महानाट्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात आलेले नाही.

वैभववाडी तालुक्यात पहिल्यांदाच प्रशासनाच्या वतीने महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. नाधवडे महादेव मंदिर नजीकच्या भव्य पटांगणावर हे महानाट्य संपन्न होत आहे. वाहने पार्किंगसाठी निटनेटके नियोजन करण्यात आल्यामुळे प्रेक्षकांची कोणतीही गैरसोय झाली नाही.
जाणता राजा या नाटकामध्ये जवळपास १५० कलाकार सहभागी झाले. घोडे, उंट यांचा देखील या नाटकात समावेश आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हे महानाट्य आयोजित करण्यात आले. जाणता राजा महानाट्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील व शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग यांनी विशेष परिश्रम घेतले. नाधवडे ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांनी देखील प्रशासनाला सहकार्य केले.