You are currently viewing अ‍ॅक्शन मोडमध्ये….

अ‍ॅक्शन मोडमध्ये….

‘लाव रे तो व्हिडीओ’ असे म्हणत लोकसभा निवडणुकीत भाजपला अडचणीत आणणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राज ठाकरेंचा पक्ष हा फक्त मुंबई, नाशिक, ठाणे पुण्यासारख्या मोठ्या शहरात अस्तित्वात आहे, अशी टीका नेहमी केली जाते. पण, यावेळी ग्रामपंचायतीच्या निमित्ताने मनसे पहिल्यांदाच गावपातळीच्या राजकारणात आपली ताकद आजमावत आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याने मनसेनी यासंदर्भात बैठक बोलावली आहे.

 

राज ठाकरे यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. राज ठाकरेंच्या ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याच्या घोषणेमुळे मनसे नेते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष वेगाने तयारीला लागले आहेत.

 

जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात मनसे कार्यकर्त्यांच्या बैठका सुरु झाल्यात. सध्या रिव्हर्स मोडवर असलेले मनसेचे इंजिन ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नशीब आजमावत पुन्हा एकदा रुळावर येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. म्हणून मनसेने आपला मोर्चा गाव पातळीवर वळवलाय.

 

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात निवडणुकीचं महत्व वेगळं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपची ताकद गाव पातळीवर आहे. ग्रामीण भागात मनसेचे काम, मनसेचे संघटन उभ करण्याची संधी आहे. यानिमित्ताने मनसेला ग्रामीण भागातील पाया भक्कम करता येऊ शकतो, राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा