*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा .सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*वाचाल तर वाचालच …*
होय, वाचाल तरच वाचाल हा शब्द प्रयोग
अक्षरश: खरा आहे, अगदी शंभर टक्के…!
आपण हजारो वर्षे मागे गेलो व शोध घेतला
तर असेच दिसते की ज्ञान ही एकच गोष्ट जगात श्रेष्ठ आहे व ती वाचून वाचून च आपल्याला मिळते हे फार मागे मागे गेलो तरी
तेच सिद्ध होते. पूर्वी लिहिण्याची कला अवगत
नव्हती तेव्हा सारे ज्ञान मुखोद्गत करावे लागत असे. ते असे मुखातून मुखात पाठ होऊन एका
पिढीतून दुसऱ्या पिढीकडे येत असे व ते जनमानसात टिकून रहात असे.
गुरूकुल पद्धतीच्या शाळांमध्ये आपले सर्व पूर्व
सुरी, कृष्ण सुदामा राम ही सर्व थोर मंडळी
गुरूच्या आश्रमात राहून गुरू, गुरू माऊलीची सेवा करत पडेल ते काम करत शिकली. वेद
पुराणे शास्त्रे साऱ्यांचे ज्ञान त्यांनी मिळवले.
पिढ्या न् पिढ्या ते पुढे सरकत राहिले.नंतर
सापडले, श्रवणबेळगोळ सारखे शिलालेख!
माणूस लिहू लागला व साहित्य निर्मितीचा स्फोटच झाला जणू! “विवेकसिंधूच्या”आधिपासून साहित्य निर्मिती होऊ लागली. अर्थात धार्मिक ग्रंथांचीच निर्मिती होणे अत्यंत स्वाभाविक होते.काही का असेना, माणूस लिहू
वाचू लागला ही मोठीच क्रांती होती म्हणू या ना?
ब्रिटिश काळात त्यांनी जाणून बुजून गुरूकुले
मोडित काढली व कारकून निर्माण करणाऱ्या
शाळा स्थापून भारतीयांना गुलाम बनविले. पण
महात्मा फुलेंसारख्या अट्टल देशभक्तांनी भारतीयांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून देशी शाळांची स्थापना करून भारतीयांची अस्मिता जागृत ठेवण्याचा प्रयत्न करत अज्ञानाच्या अंधकारातून भारतीय समाजाला बाहेर काढण्याचे महान कार्य करत
आमच्या लेकीबाळी सावित्रीच्या शाळेत शिकू
लागताच खरा ज्ञान प्रसार झाला व भारतीय
समाजात रमाबाई रानडे,पंडिता रमाबाई काशीबाई कानेटकर बाया कर्वे आनंदीबाई
जोशींसारख्या महान विदुषी निर्माण झाल्या
व खऱ्या अर्थाने साहित्याचा विस्फोट होऊन
खऱ्या अर्थाने साहित्याची ताकद समाजाला कळून ताराबाई शिंदे यांच्या जळजळीत लेखांनी महाराष्ट्रातील पुरूष समाज ढवळून निघत एकच खळबळ माजली याचे कारण वर्तमान पत्रातून घरोघरी हे लेख पोहचून मोठाच कोलाहल समाजात निर्माण झाला.
हा कोलाहल, खळबळ वाचनानेच निर्माण झाली ना? ना तरी एरव्ही समाज अजगरासारखा सुस्त पडूनच होता.म्हणजे बघा,वाचनाचा परिणाम समाजमनावर किती
खोलवर होऊ शकतो तो!
जसजशी शिक्षणात प्रगती होत गेली,लोक शिकू लागले,तेव्हा टिळक आगरकरांच्या लेखांनी अवघा महाराष्ट्र व ब्रिटिश सरकारही
ढवळून निघाले व टिळकांच्या लेखांनी तर त्यांना तुरूंगाची दारेच उघडून दिली इतके त्यांचे अग्रलेख स्फोटक ठरले व इंग्रजांना त्यांनी धडकी भरवली.भारत ढवळून काढण्याचे
सामर्थ्य किंबहुना जग हलवण्याचे सामर्थ्य
साहित्यिकांच्या लेखणीत असून वाचकच नव्हे
तर राजकिय क्रांत्याही लेखक घडवतात हे इतिहास वाचून आपल्याला कळते.फ्रेंच व अमेरिकन क्रांती त्याची उदाहरणे आहेत. समाजात जर साहित्य क्रांती घडवत असेल तर
बघा माणसाचे मन किती ढवळून निघत असेल?
रशियन कादंबरीकार “ डोस्टोव्हस्की व मॅक्सिम गॅार्की यांच्या कादंबऱ्या वाचल्यावर
त्यांनी किती नि काय वाचले असेल याचा मला
अंदाज आला.टॅालस्टॅाय पासून सारेच लेखक
आम्ही वाचनाने घडलो याचीच साक्ष देतात
इतका वाचनाचा मनावर परिणाम होतो व त्या
ज्ञानाचे मनात मंथन होऊन माणूस साहित्य
निर्मिती करतो ही हजारो लेखकांची साक्ष आहे.
आपले मराठीतले सारेच महान लेखक फडके
खांडेकर माडखोलकर अत्रे पु ल रणजित
देसाई शिवाजी सावंत साने गुरूजी जयवंत
दळवी हरि नारायण आपटे, ना स इनामदार किती नावे घ्यावीत ?…
हे सारे वाचनाने घडले व या सगळ्यांना मी वाचले म्हणून मी ही आज आत्मविश्वासाने चार अक्षरे लिहू शकते आहे.आमची पिढी काय
किंवा मागच्या पिढ्या काय? वाचनानेच घडल्या यात जरा ही अतिशयोक्ती नाही. समग्र
अत्रे वाचून तर मी इतकी समृद्ध झाले की मला
नेहमी सांगावेसे वाटते, निदान अत्रे तरी वाचा,
सावरकर वाचा, शांता शेळके सरोजिनी बाबर
वाचा, जयवंत दळवी श्री ना पेंडसे गाडगिळ वाचा. फार मोठं धन आहे हो मराठी साहित्यात
जीवन समृद्ध करणारं! पण जे वाचतो त्यालाच
ते कळते.
आताच मघाशी माझा २६ फेब्रुवारीचा धुळ्याच्या “ आपला
महाराष्ट्र “मधील “ रम्य ते बालपण” नावाचा लेख वाचून फागण्याहून एका पासस्ट वर्षे वयाच्या सद्गृहस्थांचा मला फोन आला व जवळ जवळ वाचन या विषयावरच ते पंधरा
मिनिटे बोलत होते. लोक वाचत नाही ही त्यांची
खंत होती नि बघा म्हणाले, मी तुमचा लेख वाचून पूर्ण बालपणात कसा रमून गेलो,सचित्र तुम्ही मला ते दाखवले म्हणून ते माझे आभार मानत होते. कामात वेळ मिळत नाही तरी वाचतो म्हणाले. आम्हाला तर बस्स..”बहाने
चाहिए”…माणसाने अपडेट रहावे म्हणजे माणूस तोंडावर पडत नाही व बावळट म्हणून
त्याची अवहेलनाही होत नाही. माझ्या बघण्यातील काही लोक तर असे आहेत की त्यांचा वाचनाशी दुरान्वयानेही संबंध नाही व त्याची त्यांना गरज ही वाटत नाही याचे मला
मोठे आश्चर्य वाटते! पैसा कमवा, खा प्या शॅापिंग करा गॅासिप्स करा यातच त्यांचे जीवन
बरबटले आहे व त्याची त्यांना मुळीच खंत नाही
हे विशेष! “ शेवटी म्हणतात ना.. शेणातल्या किड्यांना शेणातच आनंद असतो. उपमा वाईट
आहे पण तिच बरोबर आहे माझ्या मते.
वाचन हा माझा अत्यंत आवडीचा विषय आहे म्हणून त्याच्यावर मी कितीही वेळ बोलू शकते.
मला रिटायर होऊन ही खूप वर्षे झाली आहेत.
आमच्या घरा जवळील कुसुमाग्रज लायब्ररीत
तीन चार वर्षांपूर्वी मी एकदा गेले असता हातात
पुस्तके असलेले एक सद्गृहस्थ एकदम माझ्या
पायांवर वाकले नि एकदम चमकले. अहो, अहो.. कोण आपण म्हणताच ते उद्गारले, मॅम
मी तुमचा विद्यार्थी आहे. तुम्ही वर्गात शिकवतांना काही चांगले लेखक व पुस्तके यांची नावे वहीच्या शेवटच्या पानावर लिहून
घ्यायला सांगायच्या. आता मी एक व्यावसायिक आहे पण तीच ती वही घेऊन ह्या
ग्रंथालयातून मी तुमच्या यादीतील पुस्तक घरी
घेऊन चाललो आहे.मी थक्क होऊन गेले. मला धन्यताही वाटली, असे ही विद्यार्थी असतात तर ..जे शिक्षकांना मनात बाळगतात,
खरे सांगा.. अजून मला काय हवे..
बरंय् मंडळी.. खूप खूप धन्यवाद..
आपलीच,
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)