*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*रानभूलं…. ! बिलोरी डोळ्यांची..!*
ऊनसावल्यांचे नितळ कवडसे बघुनी
रविकिरणे ओशाळून गेली..
तांबूस प्रकाशाची पखरण करत
गर्द वनराईच्या कुशीत विसावली…!
हात लोंबत ठेवून!उभा विरक्त योगी
हिरव्यापिवळ्या पानांनी लगडला
एकमेकांच्या खांद्यावर करड्या फांद्या
ठेऊनी निवांत समाधिस्थ झाला..!
निर्जन वनराईतून वाहणारा वारा
रानभूल झाल्यागत पिंगा घालू लागला
बिलोरी डोळ्यांत अलवार आसमंत
गुंजपत्यांची नक्षी खोडाशी काढू लागला
सुर्याने वनराईकडे डोळे भरून पाहिले
लाजून त्याचा रक्तीमा नभात शिरला
वारं पिऊन तर्राट झालेली झाडं पाहून
सूर्यनारायण मावळतीकडे रवाना झाला
बाबा ठाकूर धन्यवाद
माझ्या गुलकंद या संग्रहातून…