डॉ. संजय ओक
मुंबई :
युरोपिय देशात कोरोनाचा नवा व्हायरस (New CoronaVirus) सापडला आहे. कोरोनाचा हा नवा व्हायरस (Corona New) अधिक घातक आहे. कोरोनाचा नवा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा घातक आहे. खबरदारी म्हणून परदेशातून भारतात येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. भारतीयांवर या नव्या विषाणूचा काय परिणाम होईल याबाबत कोरोनाविषयक टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक (Head of State Covid Task Force Dr Sanjay Oak ) यांच्याशी संवाद साधला आहे.
मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे
कोरोनाच्या विषाणूवर बरेचशे काटे आहेत, त्यातला एखादा काटा जरी बदलला तरी विषाणूचा नवा उपप्रकार तयार होतो.तसाच प्रकार इंग्लंडमध्ये दिसून आलाय आणि त्याची जणुकीय रचना पाहता तो ७० टक्के अतितीव्र वेगाने पसरतोय. आपली भारतीयांची प्रतिकार शक्ती,हर्ड इम्यूनिटी या वेगवेगळ्या गोष्टींचा परिणाम कितपत होतोय ते पाहावं लागेल.
सोमवारी एकाच दिवसांत इंग्लंडमध्ये ३३ हजार रूग्ण मिळाले आणि ५६० जणांचा मृत्यू झालाय, हे पाहता केवळ रूग्णसंख्या वाढणार नाही,मृत्यूही अधिक वाढतील.
दुसरा विषाणू हा त्याच फॅमिलीतील असल्यानं लसीचा काही परिणाम त्यावर नक्की होईल. विषाणूचे स्ट्रेन बदलत राहतात,तसंतसं लशीमध्येही बदल केले जातात.
आम्ही टास्क फोर्सनं केलेल्या सूचना महाराष्ट्र सरकारनं मान्य केल्या. मागील वेळी धोका स्विकारला यावेळी तो चान्स घ्यायचाच नाही, म्हणून युरोप आणि मिडल ईस्टमधून येणा-यांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल. महाराष्ट्राने जे पाऊल उचललं, त्याची पुनरावृती जगभरात केली जात आहे.
पुन्हा लॉकडाऊन अजून सुचवलेला नाही. बाहेरून येणा-यांना सक्तीनं क्वारंटाईन केल्यास ही वेळ येणार नाही. कितीही मोठा व्यक्ती असेल किंवा त्याचे काहीही संबंध असू देत त्याला घरी पाठवले जाणार नाही. जर नव्या कोरोना विषाणूचा रूग्ण मिळाला तरी त्याला रूग्णालयात स्वतंत्र ठेवले जाईल.
सध्या केलेला रात्रीच्या कर्फ्यूचा दुस-या स्ट्रेनशी संबंध नाही. २५ ते ३१ डिसेंबरच्या आनंदात आपण मास्क वापरणे, सोशल डिस्टन्शिंग सारख्या बेसिक गोष्टी विसरतो. जे आपणाला परवडणारे नाही, म्हणून रात्रीचा कर्फ्यू लावण्यात आला आहे.
हा नवा विषाणू राज्यात आला तर इतर देशात काय उपाययोजना केल्या जातायत, याचा आढावा घेवून इथंही तशी अंमलबजावणी केली जाईल. पुढचे ४-५ दिवस युरोपमध्ये काय घडतंय याकडं आमचे बारकाईनं लक्ष आहे.
जी उपाययोजना राज्यानं केलीय, ती भारतभर करणं गरजेचे आहे.