नाधवडे येथे १८ ते २० मार्च या कालावधीत विनामूल्य महानाट्य होणार सादर
उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आ. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
वैभववाडी :
३५० व्या शिवराज्याभिषेक वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित १८ मार्च ते २० मार्च या कालावधीत जाणता राजा या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महानाट्याच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नाधवडे महादेव मंदिर नजीकच्या भव्य पटांगणावर सायंकाळी ६.३० वा. ते रात्री १० या वेळेत हे महानाट्य संपन्न होणार आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हे महानाट्य आयोजित करण्यात आले आहे. इतिहास प्रेमी व नागरिकांना विनामूल्य हे महानाट्य पाहता येणार आहे.
कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघात पहिल्यांदाच विनामूल्य महानाट्य प्रयोग होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी जगदीश कातकर, वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक अवसरमल, नायब तहसीलदार अनंत कवळेकर, भाजपा पदाधिकारी बंड्या मांजरेकर, बाबा कोकाटे व भाजपा पदाधिकारी यांनी नाधवडे येथे जाऊन मैदानाची पाहणी केली. जाणता राजा या महानाट्याचे आयोजन करुन सदर नाटक पाहण्याची तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना सुवर्णसंधी उपलब्ध करून शासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.