*भगवत गीता वाचताना*
भगवत गीता श्लोकांचे वाचन कसे करावे. या संदर्भात हा अभ्यास वर्ग श्रीकृष्ण जोशी विनामूल्य घेतात. त्यावर हा मुलाखत लेख..
मुंबईतील भगवत गीता श्लोक तज्ञ श्रीकृष्ण जोशी यांचे जीवनकार्य आज आपण जाणून घेणार आहोत. श्रीकृष्ण जोशी हे मुंबईत दादर परिसरात राहतात. त्यांचे बालपण रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात गेले. खेड तालुक्यात त्यांनी आपले अकरावी मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. हे शिक्षण पूर्ण केल्यावर त्या वेळच्या रिवाजानुसार श्रीकृष्ण जोशी मुंबईत आले. मुंबईत आल्यावर त्यांनी एक कोर्स केला आणि ते बीएसटीत रुजू झाले. बीएसटीत ३८ वर्षांची सर्विस दिल्यावर श्रीकृष्ण जोशी डेप्युटी इंजिनिअर या पदावरुन १ एप्रिल १९९६ साली निवृत्त झाले. अशाप्रकारे जोशी सरांनी मोठ्या कष्टाने आपल्या जीवनाला आकार दिला. आज त्यांची दोन मुले उच्चशिक्षीत असून व्यवसाय, नौकरीच्या निमित्ताने ती दोन मुले अमेरिकेत स्थाईक आहेत. असे सर्वसामान्यपणे जीवन जगत असताना. त्यांनी स्वतः ला अध्यात्माकडे वळविले.
श्रीकृष्ण जोशी सात, आठ वर्षाचे असताना त्यांना आध्यात्माची ओढ लागली. त्यांच्या गावात मसुरकर नावाचे महाराज आले होते. त्यांनी गावातील मुलांना एकत्र जमवून भगवत गीतेचा बारावा अध्याय शिकवण्यास सुरुवात केली. तो बारावा अध्याय कसा पठण करावा याचे ज्ञान मसूरकर महाराजांनी मुलांना दिले. त्यावेळी श्रीकृष्णा जोशी आपल्या बहिणी सोबत त्या भगवत गीता वर्गाला गेले होते. त्या बाल वयात त्यांनी दोन दिवसात आश्चर्य कारक रित्या २० श्लोकांचा हा बारावा अध्याय अगदी तोंडपाठ केला. जोशी सर नेहमी म्हणत असतात, भगवत गीता वाचताना जिभेला जे वळण लागते. ते वळण आधीपासून माझ्याकडे होते! श्रीकृष्ण जोशी यांच्या वडिलांचा, काकांचा व्यवसाय भिक्षुकीचा होता, त्यामुळे त्यांच्या घरात सतत गणपती अथर्वशीर्ष, पुरुष सूक्त, रुद्र, या स्तोत्रांचे पठण होत होते. संस्कृत भाषा त्यांना अंगवळणी पडली होती. श्रीकृष्ण जोशी यांचे मोठे भाऊ कै. रघुनाथ जोशी हे संस्कृत पंडित वेद अभ्यासक होते. या अभ्यासातून त्यांनी पुस्तकेही लिहीली आहेत. त्यांचे दुसरे भाऊ कै. नरेंद्र जोशी रामायण आणि महाभारत पौराणिक साहित्याचे लोकप्रिय अभ्यासक होते. या दोघांकडून श्रीकृष्ण जोशी यांनी भगवत गीता श्लोकांचे धडे घेतले. लग्न झाल्यावर श्रीकृष्ण जोशी यांना कळाले, त्यांच्या पत्नीला देखील भगवत गीतेचा बारावा तसेच पंधरावा अध्याय पूर्ण पाठ आहे. मग त्यांनी पंधरावा अध्यायही पाठ करून घेतला. या अभ्यासाला थोडासा व्याकरण शुद्ध टच मिळावा. म्हणून ते डोंबिवलीत नवरे गुरुजींकडे गेले. अशा तंत्रशुद्ध बहुकष्टाने श्रीकृष्ण जोशी यांनी भगवत गीता आपल्या अंतरंगात भिनवली. यामुळे श्रीकृष्ण जोशी नेहमी लोकांना सांगतात.
भगवत गीता ही लहानपणापासून मुलांना शिकवली पाहिजे. भगवत गीता श्लोकांचे उपचार, त्या श्लोकांचे अर्थ तथा भगवत गीतेचे तत्त्वज्ञान हे सर्व मुलांच्या मनावर बालवयापासून बिंबवले पाहिजे, तरच भगवत गीता मुलांना सर्वसामान्यपणे म्हणता येईल, वाचता येईल. म्हणून श्रीकृष्ण जोशी आपल्या भगवत गीतेच्या वर्गातून विद्यार्थ्यांना व्याकरण शुद्धतेने भगवत गीतेच्या ओळी कशा वाचाव्यात याचे पूर्ण ज्ञान देतात. शब्दांचा उपचार नेमकेपणाने कसा करावा यावर श्रीकृष्ण जोशींचा भर असतो. ते बारा वर्ष सातत्याने मुंबईत भगवत गीता पठण वर्ग घेत आहेत. सध्या ते हा भगवत गीता वर्ग ऑनलाइन पद्धतीने घेत आहेत. या वर्गाला वयाचे कोणतेही बंधन नाही. त्यामुळे अनेकांपर्यंत हा भगवत गीता वर्ग जातो आहे.
श्रीकृष्ण जोशी यांच्याशी बोलत असताना, संस्कृत भाषा ही सहज सोपी होऊन जाते. हा अनुभव त्यांच्या विद्यार्थ्यांचा आहे. कारण सर्वसामान्य माणूस संस्कृत भाषेचे एखादे पुस्तक हातात घेतो. त्यावेळी त्याला त्या श्लोकांची भीती वाटू लागते. हे श्लोक शास्त्रवत कसे बोलावेत याचे ज्ञान त्या लोकांना नसते. श्रीकृष्ण जोशी मनातील याच भीतीयुक्त भावनेला आधी घालवतात. मग सहज सोप्या पद्धतीने ते विद्यार्थी जणांना पटवून देतात. तिथून भगवत गीतेचा सराव सुरू होतो. त्यानंतर विद्यार्थी नित्य नियमाने गीता पठण करतात. अशा रीतीने भगवत गीता सोपी होऊन जाते. हे सर्व करताना श्रीकृष्ण जोशी एका पैशाची सुद्धा फी घेत नाहीत, तरी त्यांचे हे कार्य वयाच्या ८६ वर्षानंतरही निरंतर चालले आहे. अशा अभ्यासाकांची भारतीय समाजाला आज नितांत गरज आहे. त्यातून आपली हिंदू संस्कृती खऱ्या अर्थाने मनामनात रुजणार आहे. संस्कृत भाषेचा वर्ग अशाप्रकारे इतर अभ्यासकांनी देखील घेतला पाहिजे.
श्रीकृष्ण जोशी यांचे उद्दिष्ट अगदी क्लियर आहे. त्यांना भगवत गीतेचा आणि संस्कृत भाषेचा प्रचार, प्रसार करायचा आहे. या कार्यामुळे सर्वसामान्य हृदयात संस्कृत भाषा आणि भगवत गीतेचे तत्त्वज्ञान पोहोचेल. त्यासाठी ते तळमळीने म्हणत असतात, शाळेच्या पूर्व प्राथमिक वर्गापासून मुलांना संस्कृत शिकवले पाहिजे, तर संस्कृत भाषा लोकभाषा होईल! श्रीकृष्ण सर या क्षेत्रातील केवळ एक अभ्यासक आहेत, तरी त्यांनी हे शिवधनुष्य एक हाती पेलून धरले आहे. शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, प्राध्यापक, पंडितांनी हे कार्य आता हाती घेतले पाहिजे. असेही श्रीकृष्ण जोशी विद्यार्थ्यांना सांगतात. ज्या पालकांनी शाळेत असताना संस्कृत भाषेचे ज्ञान घेतले आहे. त्यांनी आपल्या मुलांना संस्कृत भाषेविषयी गोडी लावावी. त्यांना संस्कृत भाषेची पुस्तके आणून द्यावी. हे असे केले तर संस्कृत भाषेचा आपोआपच प्रसार होईल. या विचार, कृती संदर्भात श्रीकृष्ण जोशी एक उदाहरण देतात. कोकणात एका गावात एक तरुण शिक्षिका राहत होती. तिने आपल्या जन्मलेल्या लहान मुलीला पाळण्यात असताना संस्कृत भाषा शिकवायला सुरुवात केली. ती शिक्षिका त्या छोट्या मुलीशी संस्कृत भाषेत कायम बोलायची. त्यामुळे त्या मुलीला संस्कृत भाषेशिवाय दुसरी भाषा येत नव्हती. अशा रीतीने त्या आईने आपल्या दुसऱ्या मुलीलाही संस्कृत भाषा शिकवली. ह्या दोन्ही मुली आपापसात संस्कृत भाषेतच बोलू लागल्या. म्हणून आपण सर्वांनी संस्कृत भाषेला अशा प्रकारे प्राधान्य द्यावे.
श्रीकृष्ण जोशी यांचा हा व्यातंग खरोखरच प्रबोधन करणारा आहे. आपल्याकडे असलेले संस्कृत भाषेचे ज्ञान ते ज्याप्रमाणे लोकांना विनामूल्य देत आहेत तसेच ज्ञान संस्कृत भाषा जाणणाऱ्या लोकांनी इतरांना द्यावे. कारण आपल्या भारताला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे, तरी आपल्याला लोक भाषा म्हणून संस्कृत येत नाही. हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे असे मला वाटते. त्याकरता श्रीकृष्ण जोशी यांना गुरु मानुन सर्वांनी संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार करावा, तरच श्रीकृष्ण जोशींचे हे जन कार्य पुढे जाईल. येत्या काही दिवसात त्यांची ही मुलाखत युट्युब वरून प्रसारित होईल. त्यासाठी आपण आमच्या संपर्कात राहावे. ही युट्युब मुलाखत प्रसारित होत असताना. त्याचीही माहिती आम्ही तुम्हाला देऊ.
ॲड.रुपेश पवार
9930852165