बिडवाडी येथील वणव्यात जंगले कुटुंबांचे घर जळून खाक….
उद्योजक किरण सामंत यांनी दिली १० हजारांची तातडीची मदत…
कणकवली
तालुक्यातील बिडवाडी मांगरवाडी येथील बाबू जंगले यांच्या राहत्या घरास आग लागून छप्परसह घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. या दुर्घटनेची माहिती मिळताच उद्योजक किरण सामंत यांनी तत्काळ स्वखर्चातून रोख १० हजार रुपयांची आर्थिक मदत जंगले कुटुंबियांना दिली. शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांनी ही रक्कम जंगले यांना सुपूर्त केली. यावेळी उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील, युवासेना तालुकाप्रमुख निलेश तेली, बिडवाडी उपसरपंच सुदाम तेली, दीपक दळवी, अनिकेत राणे, रविकांत राणे, धनाजी लाड, पोलीस पाटील नामदेव राणे, प्रकाश लाड, रामचंद्र आलव आदी उपस्थित होते. रविवारी १० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या आगीत पेटती साडी बाबू यांच्या आईच्या पाठीवर पडून पाठ भाजली. त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत बाबू जंगले यांचे मोठे नुकसान झाले. उन्हाळ्याच्या झळा कमी व्हाव्यात म्हणून जंगले यांनी घराच्या छप्परावर गवत पसरून ठेवले होते.घरालगत लागलेल्या वनव्याची झळ जंगले यांच्या छप्परवर असलेल्या गवताला लागली. त्यात संपूर्ण छप्पर आणि घरातील कपडे, संसारोपयोगी वस्तू बेचिराख झाल्या. या घटनेची माहिती शिवसेना शाखाप्रमुख अनिकेत राणे यांनी जिल्हाप्रमुख संजय आग्रे, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर याना दिली. आग्रे व परुळेकर यांनी सदर घटना किरण सामंत यांच्या कानावर घालताच तातडीची मदत म्हणून किरण सामंत यांनी रोख १० हजार जंगले कुटुंबियांना दिले.