पायाभरणी समारंभ सोमवारी ११ मार्चला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते..
सिंधुदुर्गनगरी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नविन उद्योजकांना घडविण्यासाठी व जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी भारत सरकारचे आधुनिक उद्योग प्रशिक्षण केंद्र या जिल्ह्यात म्हणजे सिंधुनगरीत होत आहे. या प्रशिक्षण केंद्रावर १६५.२८ कोटी रु. भारत सरकार खर्च करणार आहे. पीएम विश्वकर्मा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना देशभर राबविली जात असतांना या योजनेला आणखी बळकटी देण्यासाठी सिंदुर्गातील तरुण-तरुणींना आधुनिक प्रशिक्षण देणाऱ्या या प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सोमवार दिनांक ११ मार्च रोजी सिंधुनगरी येथे होत आहे, अशी माहिती एम एस एम ई मंत्रालयाचे नागपूर येथील संचालक पी एम पार्लेवार यांनी येथील पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या पत्रकार परिषदेला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,एम एस एम ई चे सहाय्यक संचालक राहुलकुमार मिश्रा उपस्थित होते.
श्री नारायण राणे, माननीय केंद्रीय मंत्री, एमएसएमई मंत्रालय यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नांनी, सरकारकडून एक तांत्रिक केंद्र मंजूर झाले आहे. ११ मार्च, २०२४ रोजी माननीय केंद्रीय मंत्री, MSME यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे अपर सचिव तथा विकास आयुक्त डॉ.रजनीश, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने दिनांक ११ मार्च ते १२ मार्च २०२४ या कालावधीत २ दिवसांची उद्योजक कार्यशाळा ही होणार आहे. आणि त्यात उद्योग मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या आधुनिक प्रशिक्षण केंद्रात इंडो जर्मन दर्जाचे अद्यावत प्रशिक्षण केंद्र होत आहे. दहावी बारावी पासून उच्चशिक्षित उमेदवारांना प्रशिक्षणाचे प्रवेशद्वार खुले होणार आहे. उमेदवारांना या ठिकाणी निवासी प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेला पाठपुरावा व घेतलेल्या मेहनतीमुळे या ठिकाणी राज्य शासनाने जमीन उपलब्ध करून दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सिंधुनगरीतील नवनगर प्राधिकरण कार्यक्षेत्रात प्लॉट क्रमांक ८३ ए हा २० एकर चा भूखंड या प्रशिक्षण केंद्रासाठी उपलब्ध झाला आहे. केंद्र सरकारचे उद्योग मंत्रालय या केंद्रावर पूर्ण खर्च करणार आहे. व या प्रशिक्षण केंद्राचा फायदा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील नव उद्योजक बेरोजगारांना होणार आहे असा विश्वास श्री पार्लेवार यांनी व्यक्त केला.
“नवीन तंत्रज्ञान केंद्रे/विस्तार केंद्रांची स्थापना” या योजनेअंतर्गत MSME मंत्रालयाने स्थापन केलेल्या २० तंत्रज्ञान केंद्रांपैकी सिधुदुर्ग, महाराष्ट्र येथील तंत्रज्ञान केंद्र हे एक आहे. तंत्रज्ञान केंद्राची उभारणी अंदाजे रु. १६५.२८ कोटी रुपये खर्चून केली जात आहे. हे तंत्रज्ञान केंद्र सामान्य अभियांत्रिकी क्षेत्रात विकसित केले जात आहे आणि ते पाणलोट क्षेत्रात प्रबळ असलेल्या अन्न क्षेत्राच्या गरजा देखील पूर्ण करेल. प्रशिक्षण केंद्र ही अशी सुविधा असेल जी तंत्रज्ञान सहाय्य कुशल मनुष्यबळ आणि सल्लागार क्षेत्रातील उद्योगांच्या गरजा पूर्ण करेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याला सेवा देण्याबरोबरच, ते रत्नागिरी, गोवा, कोल्हापूर इत्यादी लगतच्या भागांच्या गरजा देखील पूर्ण करेल ज्यामुळे उद्योजकांची स्पर्धात्मकता वाढेल आणि क्षेत्रातील रोजगार आणि बेरोजगार तरुणांना कौशल्य सेवा प्रदान करेल.यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि आसपासच्या भागातील तरुणांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनून रोजगार मिळवता येईल.औद्योगिक क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल बनवण्याचा उद्देश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तंत्रज्ञान केंद्र उभारल्यास तरुणांना नोकरीच्या संधी मिळण्यास आणि शहरात न राहता कमाई करण्यास मदत होणार आहे. या कालावधीत सिंधुदुर्ग आणि आसपासच्या भागातील लोकांना मंत्रालयाच्या पीएम विश्वकर्मा योजनेची माहिती व्हावी यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेबाबत जनजागृती कार्यक्रमही आयोजित केला जाणार आहे. यातून लघु आणि मध्यम उद्योगांचा विकास होईल.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील लघु व मध्यम उद्योगांचा विकास करून जनजागृती करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यमान आणि संभाव्य उद्योजकांना एमएसएमई मंत्रालयाच्या विविध योजनांबद्दल. तसेच त्यांना सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेची जाणीव करून देणे आणि योजनेचा लाभ घ्यावा यासाठीही उद्योग मंत्रालयाचे प्रयत्न आहेत.
या सोहळ्याच्या निमित्ताने या जिल्ह्यातील युवक युवतींचे नागरिकांचे पीएम विश्वकर्मा योजनेमद्ये नोंदणी करण्यासाठी स्टॉल लावण्यात आले आहेत. इच्छुकाने आपल्या आधार कार्ड, आधार वर संलग्न झालेला मोबाईल नंबर, बँक पासबुक व रेशन कार्ड हे सोबत आणावे असे आव्हान करण्यात आले आहे. तर याच ठिकाणी एकूण ५० स्टॉल्स असून इंजिनिअरिंग संबंधी उत्पादने, क्वायर उद्योग व बचत गट यांच्या उत्पादनांची प्रदर्शन व विक्री होणार आहे. कर्ज प्रस्तावाच्या मार्गदर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा ही एक स्टॉल राहणार आहे. याचाही नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उद्योग मंत्रालयाने केले आहे.