You are currently viewing स्त्री—विधात्याचे सृजनशिल्प

स्त्री—विधात्याचे सृजनशिल्प

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम लेख*

 

*स्त्री—विधात्याचे सृजनशिल्प* 

 

स्त्री..विश्वनियंताची सुंदर निर्मिती…स्त्री..एक सृजन शक्ति…स्त्री..परमेशाने संसारास दिलेले लावण्यदान…स्त्री..अनंत गुणांची खाण…स्त्री.. वात्सल्याचा अखंड वहाणारा झरा.. स्त्री..मायाममतेचे आगर..स्त्री.. सृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न…स्त्री कोमलांगी… ..स्त्री..प्रेमनगरीची अनभिषिक्त सम्राज्ञी..स्त्री घरकुलाची स्वामिनी..सृजन शक्ती धारिणी!

खरंच ,स्त्री म्हणजे विधात्याचे अद्भूत..देखणे सृजनशिल्प!

 

स्त्री केवळ सुंदरच नव्हे तर बुद्धीमानही आहे पूर्वकाळी गार्गी,मैत्रेयी सारख्या विदुषी होऊन गेल्यातच न! अहिल्या द्रौपदी ..सीता..तारा.. मंदोदरी. तथा..या पंचकन्यांचे प्रात:कालीन स्मरण केले जातेच की!त्यांची महतीच स्मरणयोग्य आहे . शिवाजीच्या काळात घुडसवारी, तलवारबाजी,युद्धनितीचे शिक्षणही स्त्रियांना मिळत होते. स्वतः जिजाऊ तरबेज होत्या. राणी लक्ष्मीबाई युद्ध कलेत पारंगत होती,हो न! स्त्री आपल्या संस्कृतीत पूजनीय ..आदरणीय होतीच.

मधल्या काळात स्त्री मागे पडली. शिक्षणापासून वंचित झाली. शीलरक्षणासाठी घराबाहेर पडेनाशी झाली नी दुय्यम स्थानावर गेली.

 

सावित्रीच्या लेकी आम्ही

आम्हा आईचा अभिमान

जीवन अमुचे सुधारले

गाऊ तिचे गुणगान !

 

कधीकधी मनांत विचार येतो सावित्रीबाई नसत्या तर,! आम्ही स्त्रिया अशाच अज्ञानाच्या..परंपरेच्या.गुलामीच्या कोठडीत डांबून पडलो असतो.‌हे मोकळे आकाश..हा मोकळा श्वास..हे मुक्त जीवन जगता आले असते का?

पण आज मात्र, झाले मोकळे आकाश..झाला मोकळा श्वास.! खोलली स्त्रीसाठी शिक्षणाची द्वारे..रोखलेस अन्यायाचे‌‌ वारे. . नी हे सर्व सावित्री माय माऊली मुळे घडलंय हो न!

 

वर्तमानात स्त्रीने अनेक क्षेत्रात गगन भरारी घेतली आहे.

इंजिनिअर, डॉक्टर, वकील,संशोधक, चार्टर्ड अकाउंटंट, शिक्षीका,राजकारणी.. पायलट; ती बनली आहे.एवढेच नव्हे तर संरक्षण क्षेत्रातही ती उत्तम कामगिरी करतेय.

क्रीडाक्षेत्रात पी.टीऊषा..मेरी कोम..सायना ,पी व्ही सिंधु, सानिया, चानू..,यांनी “लक्ष्य” गाठले आहे. तर समाजकार्यात सिंधुताई सपकाळ ..सुधा मूर्तीचे नांव कमावले आहे. गायन क्षेत्रात लतादिदी आशा भोसलेने गगन उंची गाठली आहे .शांता शेळके,इंदिरा संत, बहिणाबाई, दुर्गा भागवत, या कवयत्री लेखिकांना कोण विसरेल?सर्वच क्षेत्रे स्त्रीने बुद्धिमत्ता, कौशल्य ,व्यवहार चातुर्य,जिद्द,संयम अविरत परिश्रमाच्या जोरावर पादाक्रांत केली आहेत.

आजी,आई,बहिण ,पत्नी.मैत्रीण,नी मुलगी ..ही स्त्रीची रूपे..ही नाती म्हणजे मूर्तिमंत वात्सल्य !प्रेम ! ती कर्तव्यमूर्ती, आनंद पेरणारी.. घराला घरपण देणारी… सुसंस्कारित, नवीन पिढी घडवणारी…प्रसंगी नवदुर्गेचे रुप धारणारी आधुनिक गृहिणी..घराचे नंदनवन करणारी ती! सृजनशक्तीची प्रतिक .!.शिक्षीत स्त्री, कुटुंब..समाज .. देशाला नेहमीच प्रगतीपथावर नेते.

आधुनिक असूनही तिला तिचा संसार प्रिय आहे. नवदुर्गा बनून ती घर.. नोकरी. दोन्ही आघाड्या सांभाळते आहे . सासर माहेरचा दुवा बनून दोन्ही कुटुंबे तिने जोडून ठेवली आहेत. माणसं जोडण्याची कला तिला मुळातच अवगत आहे.‌ संसाराचे क्लेश..ताप..सहन करीत ती संसार पुढे नेते आहे.

पण, प्रश्न उरतोच की एवढे करुनही स्त्री खरंच मुक्त झालीय कां? बलात्कार..घरगुती हिंसाचार,..हुंडाबळी.. स्त्रीभ्रूणहत्या..यातून तिची सुटका झालीय? समाजाचा तिच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदललाय? काही अंशी नकारात्मक उत्तर येतेय. मात्र. परिस्थिती हळूहळू बदलते आहे, हे‌ ही. मान्य! पण संविधानाने दिलेला समान दर्जा पुस्तकी न रहाता प्रत्यक्षात मिळायला हवा.‌ हो की नाही?

‌‌ त्यासाठी केवळ एक दिवस “महिलादिन” साजरा करून चालणार नाही. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी सातत्याने काम, सकारात्मक विचारांची पेरणी करावी लागेल. कुटुंबातूनच मुलींकडे आदराने पहाण्याची शिकवण कृतीतून द्यावी लागेल. संसारासाठी ..कुटुंबासाठी स्त्री पुरूष एकमेकांना पूरक ठरले पाहिजेत. स्त्रीनेही स्वतःस ओळखून त्यानुसार वागले, बोलले पाहिजे. मग तिला ख-या अर्थाने मुक्तपणे गगन भरारी घेता येईल.नी वो दिन अब,दूर नही,असं आता वाटू लागलंय. तुम्हाला काय वाटतंय?

©️®️

 

सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.

प्रतिक्रिया व्यक्त करा