व्ही. एन. नाबर प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न…
बांदा
कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचलित येथील व्ही. एन. नाबर प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला आघाडी अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब या उपस्थित होत्या.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश कामत, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर मोटे, शाळेचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य शंकर उर्फ भाऊ वळंजू, नारायण उर्फ शशी पित्रे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुनील राऊळ, भाऊ वाळके, प्रसाद परब, अवंती पंडित, रेश्मा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती देवीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी केले. पाहूण्यांची ओळख शिक्षिका सौ. दिक्षा नाईक यांनी केली. वार्षिक अहवाल वाचन उपमुख्याध्यापिका सौ. शिल्पा कोरगावकर यांनी केले.
श्री कामत यांनी आदर्श विद्यार्थी तसेच उत्कृष्ट ॲथलेट या विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली. यात आदर्श विद्यार्थी म्हणून दहावीची साईमा आगा आणि उत्कृष्ट ॲथलेट गीतांजली देसाई यांना यावेळी गौरविण्यात आले. सौ. घारे-परब यांनी यावेळी बोलताना संस्थेचे कौतुक करत शिक्षकांचे सलग १६ वर्षे १०० टक्के निकाल येऊन विद्यार्थी उच्च पदावर शिक्षण घेत असल्यामुळे अभिनंदन केले. मान्यवरांच्या हस्ते शालेय वर्षातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका लविना डिसोझा यांनी केले. आभार शिक्षिका रसिका वाटवे यांनी मानले.