You are currently viewing 08 मार्चच्या जागतिक महिला दिनाच्या सप्ताहानिमित्त काही आयएएस आयपीएस महिला अधिकाऱ्यांचा परिचय करून देण्याचा हा अल्पसा प्रयत्न

08 मार्चच्या जागतिक महिला दिनाच्या सप्ताहानिमित्त काही आयएएस आयपीएस महिला अधिकाऱ्यांचा परिचय करून देण्याचा हा अल्पसा प्रयत्न

*08 मार्चच्या जागतिक महिला दिनाच्या सप्ताहानिमित्त काही आयएएस आयपीएस महिला अधिकाऱ्यांचा परिचय करून देण्याचा हा अल्पसा प्रयत्न.*

*आकाश झेप घेणाऱ्या सनदी अधिकारी : पल्लवी चिंचखेडे*

आमच्या अमरावतीच्या डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी श्री तुकाराम मुंढे हे आयएएस झाले तेव्हा त्यांचा सत्काराचा कार्यक्रम अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित केला होता .या कार्यक्रमाच्या प्रचंड उपस्थितीत एक लहान शालेय मुलगी उपस्थित होती. तिचे नाव पल्लवी चिंचखेडे आणि या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन तिच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्या मुलीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास प्रारंभ केला आणि आज ती मुलगी केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएस ही परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मुलगी अमरावतीच्या सर्वसामान्य भागात राहणारी मुलगी आहे. हा परिसर बिच्छू टेकडी या नावाने ओळखला जातो. तसे पाहिलं तर हा पूर्ण परिसर म्हणजे गरीब वस्ती . आजूबाजूला वीटभट्ट्या .बिच्छू टेकडी म्हणजे विंचू खूप निघतात म्हणून बिच्छू टेकडी असे नामकरण झालेला. पण आज अमरावती शहरातील प्रतिष्ठित नगरांना मागे टाकून एका सर्वसामान्य गरीब परिस्थितीतील ही मुलगी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे ही खरोखरच अभिमानाची बाब आहे. पल्लवीचे वडील पेंटरचा व्यवसाय करतात आणि आई शिवणकाम करते. पल्लवी जेव्हा आयएएस झाली तेव्हा मी दिल्लीला होतो.ती पास झाल्याचे कळताच मी तात्काळ अमरावतीला पोहोचलो आणि पल्लवीचे घर गाठले. तिला सांगितले ज्या तुकाराम मुंढेंसाहेबांच्या कार्यक्रमास तू आली होतीस त्या कार्यक्रमाचा मी आयोजक आहे. मी काही बोलायच्या आतच तिने वाकून मला नमस्कार केला. मलाही कृतार्थ झाल्यासारखे वाटले. माझी मुलगी पल्लवी जरी कलेक्टर झाली नाही तरी माझ्या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन पल्लवी चिंचखेडे आयएएस झाली हे काही कमी नाही. पल्लवीशी चर्चा करताना तसेच त्याच्या परिवारातील सदस्यांशी चर्चा करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती ही की तिचे वडील सजग होते .अनेक आयएएस सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या घरी रंग देताना आपलीही मुलगी यांच्यासारखी अधिकारी व्हावी असे मनोमन त्यांना वाटत होते. ही त्यांची आंतरिक इच्छा होती आणि त्यातून त्यांनी वर्तमानपत्रातील कात्रणे काढायला सुरुवात केली. आयएएसच्या संदर्भात काही कात्रण दिसले तर कात्रण कापायचे आणि पल्लवीला दाखवायचे व जपून ठेवायचे .आयएएसच्या परीक्षेमध्ये वर्तमानपत्राचे किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आम्ही विद्यार्थ्यांना वारंवार समजावून सांगत असतो. पण त्याची दखल एका सर्वसामान्य व्यवसाय करणाऱ्या माणसाने घेतली व आपल्या मुलीस केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी जीवाचे रान केले हे महत्त्वाचे आहे. एका गरीब माणसाला हे कळलं आणि तो पेटून उठला. पल्लवी ही अमरावती शहरातील कुठल्याही हाय फाय शाळेमध्ये शिकलेली मुलगी नाही आहे. त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या आनंद प्राथमिक शाळेमध्ये तिचे शिक्षण झालेले आहे. या शाळेचे नाव अमरावतीच्या चांगल्या पहिल्या पंचवीस शाळांमध्ये धृनाही आहे .परंतु कौन कहता है की आसमान मे सुराग नही होता .एक तो पत्थर तबियत से उछालो यारो या प्रेरणेने तिने जे परिश्रम घेतले ते निश्चितच जगावेगळे आहेत. पल्लवी जिथे राहते तो परिसर अमरावती शहराला परिचित असा आहे .परंतु अजूनही त्या परिसराचा विकास झालेला नाही .पल्लवीच्या घरापर्यंत अजूनही डांबरी रस्ता नाही. आम्हाला तिच्या घरापर्यंत चिखलातूनच जावे लागले. बाहेर पाऊस सुरू होता .पल्लवीच्या घराला कमट्यांचे कुंपण घातलेले आहे. त्यावर हिरवी नेट चढवलेली आहे. आता पल्लवी अधिकारी झालेली आहे आणि ही वार्ता प्रसार माध्यमाने सोशल मिडियाने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पसरवली ही पल्लवीच्या छोट्याशा खोलीमध्ये अक्षरशः पुष्पगुच्छांचे ढीग लागलेले आहेत. आई-वडील तर गहिवरून गेलेले आहेत. शहराच्या कानाकोपऱ्यातून लोक भेटावयास येत आहेत. योगायोगाने मी जेव्हा गेलो तेव्हा तिच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पण भेटायला आल्या होत्या. त्यांचा आनंद मावत नव्हता .फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री कुरळकर साहेब हे देखील आपल्या स्टाफ सह तिचे अभिनंदन करायला आले होते. पल्लवी जेव्हा अमरावतीला अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिकत होती तेव्हा तिने एका स्पर्धा परीक्षा कार्यशाळेसाठी मला बोलावले होते असे ती व तिचे वडील मला सांगत होते. चांगल्या पगाराची नोकरी सोडून पल्लवीने बार्टीच्या सहकार्याने यूपीएससीचे प्रशिक्षण दिल्लीला घेतले आणि ती परीक्षा तिने उत्तीर्ण करून दाखवली .खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला भूषण ठरावी अशी ही घटना आहे .कारण की अमरावती शहरातील बिच्छूटेकडी हा भाग झोपडपट्टीमध्ये मोडतो. एका झोपडपट्टीमध्ये राहणारी मुलगी आयएएसची परीक्षा पास होऊ शकते हे खरोखरच इतिहासामध्ये नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. पल्लवीचे जुने घर चाळीसारखे आहे. घराला लागूनच बारमाही नाला आहे आजूबाजूला सगळी गरीब वस्ती. परंतु जितनेवाले कोई अलग काम नही करते व हर काम अलग ढंग से करते है या न्यायाने पल्लवीने परिश्रम केलेले आहेत.पल्लवीच्या आईने लोकांचे कपडे शिवता शिवता आपल्या मुलीचे आयुष्य शिवून टाकलेले आहे. आणि ते इतके सुंदर शिवले की की संपूर्ण महाराष्ट्राने तिची दखल घेतलेली आहे .पल्लवी तू अमरावती शहराचा मान उंचावली आहेस .आज तुझ्यामुळे अमरावती शहराचे नाव सर्व सोशल मीडियावर सतत फिरत आहे. तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी हे बाबासाहेबांच्या बाबतीत केलेले विधान तू बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करून समाजासमोर एक आदर्श ठेवलेला आहेस. गरीब परिस्थितीवर मात करून गरीब परिवारात राहून गरीब परिसरात राहून तुझे जे यश संपादन केलेले आहे ते निश्चितच मोलाचे आहे. पल्लवी च्या घरासमोरून थोड्या अंतरावर नागपूर मुंबई सुपर एक्सप्रेस हायवे गेलेला आहे. फारसे अंतर नाही .दोन हजार फुटाचे अंतर असावे. या रस्त्यावरून सतत मोठ्या मोठ्या वाहनांची वर्दळ सुरू असते .परंतु त्या वर्दळीचा पल्लवीच्या अभ्यासावर काहीही परिणाम झाला नाही. प्रत्येक मिनिटाला सुपर एक्सप्रेस वर वरून जाणारे वाहन तिला कोणताही व्यत्यय निर्माण करू शकले नाही आणि म्हणून शृंखला पायीच असू दे मी गतीचे गीत गाईन दुःख झेलण्यास आता आसवांना वेळ नाही या न्यायाने तिने संकटावर मात करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. पल्लवीच्या या जिद्दीला आणि तिला सातव्या वर्गापासून कलेक्टरच्या परीक्षेला तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या व तिला माझ्याकडे लहानपणीच घेऊन येणाऱ्या आणि सतत प्रेरणादायी ठरणाऱ्या तिच्या वडिलांना आणि सतत शिलाई काम करून आपल्या पोरीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या व तिला यूपीएससीच्या पदी विराजमान करणाऱ्या आईसाहेबांना त्रिवार सलाम .

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक, डॉ.पंजाबराव देशमुख अकादमी अमरावती कॅम्प 9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा