सावंतवाडी :
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे तसेच शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानामध्ये माध्यमिक गटातून यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल, चराठे या शाळेला सावंतवाडी तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
शाळेने शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा, प्रशासकीय नियोजन, लोकसहभाग, कौशल्य विकास व व्यवसाय शिक्षणाची तोंड ओळख, पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणे, अंगभूत कला क्रीडा गुणांचा विकास इत्यादी घटकांमध्ये उत्तम कामगिरी करत सावंतवाडी तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. शाळेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रोख तीन लाख रुपये पारितोषिक व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
शाळा राबवित असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम व संचालक मंडळाचे मार्गदर्शन यामुळेच शाळेला हा पुरस्कार मिळाल्याचे मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी यावेळी सांगितले. शाळेच्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक यांनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.