शासनाच्या टी.बी. मुक्त ग्रामपंचायत योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद…
जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतीचे प्रस्ताव प्राप्त; २९ फेब्रुवारीला पडताळणी…
सिंधुदुर्गनगरी
शासनाने सुरू केलेल्या टी. बी. मुक्त ग्रामपंचायत योजनेला पहिल्याच वर्षात चांगला प्रतिसाद लाभला आहे. जिल्ह्यातील ७३ ग्राम पंचायतीचे प्रस्ताव प्राप्त झाले असून २९ फेब्रुवारीला याची पडताळणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ हर्षल जाधव यांनी दिली.
देशात २०१५ मध्ये असलेल्या रुग्णांच्या संख्येच्या ८० टक्के कमी रुग्ण संख्या २०२५ पर्यंत करण्याचा निर्धार शासनाने केला आहे. त्यासाठी विविध उपाययोजना शासन राबवित आहे. त्यातीलच एक पर्याय म्हणून टी बी मुक्त ग्राम पंचायत हा कार्यक्रम २०२३ पासून राबविण्यास सुरुवात केली असल्याचे डॉ जाधव यांनी सांगितले. त्यानुसार आरोग्य यंत्रणेमार्फत ग्राम पंचायत स्तरावर याची जनजागृती करण्यात आली होती. यामुळे ७३ ग्राम पंचायतीची आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावी काम करून त्याचे प्रस्ताव पाठविले आहेत. वरिष्ठ स्तरावर २९ फेब्रुवारी रोजी याची पडताळणी केली जाणार आहे, असे डॉ जाधव म्हणाले.
यावेळी पुढे बोलताना डॉ जाधव यांनी २०१५ मध्ये जिल्ह्यात वर्षभरात सुमारे १४ हजार नागरिकांची क्षयरोग तपासणी केली जात होती. त्यावेळी ११०० रुग्ण मिळायचे. मात्र, आता वर्षाला २४ हजार नागरिकांची तपासणी केली जाते. परंतु रुग्ण मिळण्याची संख्या ८०० ते ९०० एवढा खाली आला आहे. परिणामी २०१५ ते २०२० या पाच वर्षात नवीन रुग्ण मिळण्याचे प्रमाण ३९ टक्के ने कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याला कांस्य पदक प्राप्त झाले आहे. तर जिल्ह्यात त्यापुढे जावून ५९ टक्के काम झाले आहे. त्यामुळे रौप्य पदकासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती दिली.