*लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासिका लेखिका कवयित्री सौ.भारती भाईक यांनी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने लिहिलेला अप्रतिम ललित लेख*
*🌹रुणझुणती शब्दनाद…🌹*
♥️शब्दमाधुर्याचे नुपूर रुणझुणत सखे मराठी ,तू येऊनी मनामनात दरवळलीस..कायम वास्तव्यास आलीस…..काय वर्णू तव गुण…गुणगुणान् गुणवती तू मम माय मराठी…मनःपटलावरी शब्दे शब्दे रुजलीस..
*”तू सुंदर चाफेकळी….”* अशा शब्दलावण्यात न्हाऊन “गंsssss अं…..साजणे….साजणे…साजणे साजणे गं…..आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी..” ठेक्यावर अंगांगात भिनत गेलीस. मनोरंजनात मनमुक्त रमत गेलीस.
विविध नाट्यसंगितातून येथेच्छ भेटलीस…”मानापमान” “संशयकल्लोळ””नटसम्राट”…..एक म्हणून विचारु नको.
“सुहास्य तुझे मनास मोहे…” म्हणत व्यक्त होणारं प्रेम…”प्रथम तुज पाहता…..” “अनुरक्त झालो सखी स्वीकारशील का?”हे शब्दनाद ह्रदयस्थ होऊन गेले.
नि “मी मज हरपून बसले गं….सखे मी हरपून बसले गं….” म्हणत गझलमध्ये आत्ममग्न होत तू आत्मजा झालीस सखी.
“इश्श..” शब्दाशी एकरुप होत, हरीत कंकणांच्या किणकिणीत पैंजणीचे नुपूर रुणझुणले…शब्दनाद एक झाले …नयनचक्षूसमोर आली ती नवविवाहीता…नि…”नववधू प्रिया मी बावरते…..” गुणगुणत, हळदुल्या पाऊलांनी रुणझुणत्या नुपूरनादात….घरभर वावरतांना नाजूक शब्दलयीत मने जिंकून घेत निघाली…!!! तिच्या अस्तित्वाला शब्दांचा दरवळ..नि बघता बघता ह्रद्यस्थ होत गेलीस, मनरमणे!!!
“निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई..” वात्सल्यात डुंबलेला शब्दनाद ममत्व प्रसवू लागला…नि जगी माता थोर …तिच्या प्रेमळ शब्दात बाळ सुखावू लागला…!
“मोगरा फुलला…” म्हणत अभंगातून भेटलीस नि “पैल तो गे काऊ कोकताहे….” म्हणत सात्विकता प्रदान करीत गेलीस….केवळ शब्द नव्हते गं ते…माऊलीने देहत्वाचा पसारा कसा आवरावा याचं केलेलं मार्गदर्शन होतं…अशा कितीतरी अभंग ओवीतून सुभाषितापर्यंत तू जीवनाचे मोल सांगत गेलीस…”भिऊ नकोस मी पाठीशी आहे..” या सद्गुरुंच्या शब्दांवर जग तरतंय ,राणी….आहेस कुठे?? .”मना सज्जना भक्ति पंथेचि जावे….” जगण्याचं सार्थ वर्णन तुझ्यातूनच गवसलं….नि जीवनमोगरा सुगंधित होऊन गेला….!!
“गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे…” म्हणत मातीचे ऋण फेडत गेलीस….”जयोस्तुते….जयोस्तुते…श्रीमहन्मंगले …” त भरुन पावलीस….ऋण शिरी डोईजड होऊ देऊ नये, शिकवून गेलीस…”भेटीले जे जे येथूनी…येथेचि ते देत सूटावे…” वेचलेले शब्दनाद तू शब्दशब्द माणिक मौक्तिक उधळीत स्वानंदे पदन्यास करीत सुटलीस…नि या दो करा किती लेऊ मी ऐश्वर्य… यासम स्थिती मराठीयांची झाली.
“प्रेम कर भिल्लासारखं…” म्हणणारे कुसुमाग्रज… तुझ्यामुळे अमर होऊन गेले…प्रत्येक मराठी मनाचा “कणा” ते होऊन गेले.
“श्रीमान योगी” च्या शब्दबंधातून तू शिवाजीराजे शिकवूनच नाही गेलीस..तर रुधिरात एकरुप करुन गेलीस….तर “छावा” तून जगरहाटि चं राजकारण सांगून गेलीस..” “राणी लक्ष्मीबाई” “अहिल्याबाई” केवळ तुझ्यामुळे समजली.
साहित्य विश्वव्यापक असतं नि साहित्याचा आत्मा एक असतो…हे पटवीत कैक अनुवादित शब्दबंधातून समक्ष प्रकटलीस…..किती गाऊ तुझी थोरवी?? “आनंदी गोपाळ” च्या रांगेत समोरच अनुवादित “रीबेका” भेटलं….नि जशी आनंदीत गुंगले होते तसेच रीबेकातही रंगून गेले..कोण आपलं…कोण परकं….कोण विदेशी..कुठली विभागणी..काही काही नाही… आपली तशीच त्यांचीही संस्कृती च ना???….लगेच कळली.नि मग मात्र कैक पुस्तकांच्या फैरीत तीही संस्कृती अक्षरशः जगले…नि कळून चुकले… *भावना सारख्याच असतात.*
आज ह्या ज्या शब्दकळ्या मज स्फुरतात आहे… ही देखिल तुझीच देणं.
“वेचियले जे येथूनी….
पेरीते तेच ते वेचूनी…
गे माय मराठी माझे..
फिरुनी जन्म इथेच लाभू दे..
सहस्त्र वेणा सहूनी…सहस्त्र वेणा सहूनी….”
सौ. भारती भाईक