वेंगुर्ला :
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात परुळेबाजार ग्रामपंचायतीला राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्यात यश मिळाले आहे. बहुप्रतिक्षित असा या स्पर्धेचा निकाल शासनाकडुन जाहीर करण्यात आला.
ग्रामपंचायत परुळेबाजार ने सन २०२०/२१ व २०२१/२२ मध्ये राज्यात प्रथम तर सन २०१९/२० मध्ये राज्यात द्वितीय क्रमांकाचे यश मिळविले आहे. ग्रामपंचायतीने आतापर्यंत विविध अभियानात यश मिळविले आहे. यामध्ये निर्मल ग्राम पुरस्कार, यशवंत पंचायत राज पुरस्कार, स्मार्ट ग्राम, राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय पंचायत पुरस्कार, स्वच्छ सर्व्हेक्षण मध्ये मानांकन असे विविधांगी यश मिळविले आहे.
तसेच ग्रामपंचायतीने विविध स्वच्छतेच्या नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. या सर्वाची पाहणी करून अभ्यास करण्यासाठी आतापर्यंत राज्यातील जिल्हापरिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांनी भेटी दिल्या आहेत आणि अजूनही देत आहेत. यासर्व यशामध्ये गावांतील ग्रामस्थ ग्रा.पं. कार्यकारीणी, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, आशा स्वयंसेविका, बचत गट, सी आर पी, तसेच आजी, माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, माजी जि.प. सभापती निलेश सामंत, मार्गदर्शक प्रदीप प्रभू, जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी, पंचायत समिती अधिकारी यांचे सहकार्य नेहेमीच असते. त्यामुळेच हे यश मिळाल्याचे सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुदवडकर व ग्रामसेवक शरद शिंदे यांनी मत व्यक्त केले.