You are currently viewing भाई जगताप.. सच्या कार्यकर्त्याचा खडतर प्रवास.

भाई जगताप.. सच्या कार्यकर्त्याचा खडतर प्रवास.

1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुंबईत अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झाली. काही अवधीतच काँग्रेस पक्षाने संपूर्ण देश व्यापला आणि पुढे काँग्रेस हीच भारताची विचारधारा झाली. मात्र अलीकडच्या काही वर्षात मुंबईतच काँग्रेसचे अस्तित्व दोलायमान झाले. परिणामी संपूर्ण देशात काँग्रेस विकलांग झाली. मुंबई आणि महाराष्ट्रातील काँग्रेसला गतवैभव प्राप्त झाल्याशिवाय देशातील काँग्रेसला उभारी येणार नाही असे या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझे मत झाले आहे. अशा कठीण प्रसंगी मुंबई काँग्रेसला पूर्वस्थितीत आणण्याची जबाबदारी पक्षश्रेष्टींनी श्री.भाई जगताप यांच्यावर सोपवली आहे. बऱ्याच म्हणजे जवळपास तीन चार दशकानंतर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी मराठी व्यक्तीची निवड झाली आहे. जो निर्णय वीस वर्षांपूर्वी होणे अपेक्षित होते तो आत्ता झाला. काँग्रेस पक्षश्रेष्ठी सध्या जमिनी वास्तव विचारात घेऊन निर्णय घेवू लागले आहेत. दिल्लीच्या वाऱ्या करुन पुढारपण मिळवलेल्या उपटसुंभांना महत्वाच्या पदांवर नेमण्याचा जो शिरस्ता मधल्या काळात वाढला होता, त्यामध्ये मोठा बदल होताना दिसत आहे. सध्या काँग्रेस नव्याने कात टाकताना दिसत असून तळागाळात काम करणाऱ्या सामान्य, प्रामाणिक, निष्ठावान कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय घेण्याची प्रक्रिया पक्षात पुन्हा सुरु झाल्याचे दिसते. त्याबद्दल सोनियाजींना धन्यवाद दिले पाहिजेत. गेली पस्तीस चाळीस वर्षे देशाच्या काँग्रेसची सूत्रे हातात घेऊन बसलेल्या बुजुर्ग दरबारी हायकमांडच्या हातून काँग्रेसची सूत्रे हळूहळू निष्ठावान तरुण नेतृत्वाकडे सरकू लागल्याचे अलीकडच्या काही निर्णयातून दिसू लागले आहे. काँग्रेस पक्षासाठी हा चांगला सुकून ठरेल आणि वैयक्तिक अहंभाव व गटातटात अडकलेली काँग्रेस एकसंघ होईल. श्री.भाई जगताप यांची निवड हा या नव्या विचारांचा परिपाक आहे.
श्री.भाई जगताप… एक लढवय्या नेता. भाईंची राजकीय वाटचाल अत्यंत खडतर आणि संघर्षमय आहे. मुंबईतल्या कामगार वस्तीत सामान्य गरीब कुटुंबात जन्मलेले भाई अगदी लहान वयातच चळवळीत आले. आपल्या अवतीभवती राहणाऱ्या कामगारांची दयनीय अवस्था त्यांच्या संवेदनशील मनाला सतावत होती. याच कामगारांच्या कष्टावर सजलेली मुंबई आणि श्रीमंत झालेले काही लोक यांचा रुबाब व दबाव पाहून भाईंचे मन अस्वस्थ होत होते. *याच अस्वस्थतेतून एका आक्रमक, झुंजार कामगार नेत्याचा उदय झाला.. त्याचे नाव भाई जगताप.*
दरम्यानच्या काळात मुंबईतील कामगार चळवळही वेगळ्या वळणावर पोहोचली होती. पोटभरु, स्वार्थी लोकांचा कामगार संघटनेत शिरकाव झाला होता. दहशत आणि गुंडागर्दी हीच कामगार संघटना व कामगार नेत्यांची ओळख झाली होती. अशा पार्श्वभूमीवर भाई जगताप यांनी आपली स्वतंत्र कामगार संघटना उभारण्याचे शिवधनुष्य उचलले. भाईंवर पहिल्यापासून महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या व्यक्तीमत्वांचा प्रभाव होता आणि काँग्रेस विचारधारेवर त्यांचा विश्वास होता. सर्व प्रकारच्या लोकांची वस्ती असलेल्या (कॉस्मोपॉलिटन शहर) मुंबई नगरीचे बहुविध संस्कार भाईंच्या मनात रुजले होते. मुंबईसारख्या शहराला विकासाभिमुख बनवायचे असेल तर व्यापक विचारांची आवश्यकता आहे आणि त्यासाठी काँग्रेस हाच पक्ष योग्य आहे हे जाणून भाईंनी आपल्या कामगार संघटनेला काँग्रेसशी जोडले. पुढे हा कामगार पुढारी काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून ओळखला जाऊ लागला. पडत्या काळात भाईंनी मुंबई काँग्रेसला भक्कम आधार दिला. पोस्टर चिटकवण्या पासून गर्दी जमवण्यापर्यंत सगळी जबाबदारी भाईंनी सांभाळली. मात्र पक्षाच्या बड्या नेत्यांची मेहर नजर कधीही भाईंकडे वळली नाही. तरीही भाई अत्यंत निष्ठेने सतत काँग्रेस सोबत राहिले. जेथे अडचण असेल तेथे भाईंना पुढे करायचे, बलाढ्यांना तोंड देण्यासाठी भाईंवर जबाबदारी द्यायची पण पक्षाच्या अथवा सरकारमधल्या मुख्य, वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी भाईंना कधीही मिळाली नाही. आत्तापर्यन्तच्या राजकारणात भाईंनी जे मिळवले ते स्वकर्तुत्वाने मिळवले. भाईंना कोणी गॉडफादरही मिळाला नाही. गेल्या चार दशकातील मुंबईतुन झालेले मंत्री आणि अध्यक्ष पहिले तर भाईंवर केवढा अन्याय झाला हे नक्की लक्षात येईल. मात्र भाई कधीही पक्ष नेतृत्वावर नाराज झाले नाहीत. खरेतर ज्यांना खूप काही मिळाले (काहीजणांना तळात काम न करता केवळ पुढे पुढे करुन मिळाले) त्यांनी सत्ता जाताच पक्ष व नेत्यांच्या विरोधात भूमिका घेतली. परंतु भाई जगताप अत्यंत निष्ठापूर्वक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करीत राहिले. मधल्या काळात तर मुंबई काँग्रेसचा एकमेव मराठी चेहरा म्हणून विरोधक भाईंना डिवचण्याचा प्रयत्न करीत, एवढे राबून काय मिळाले म्हणून फितवण्याचा प्रयत्न करीत. परंतु भाई मात्र अगदी शांतपणे व ठामपणे त्याला उत्तर देत. भाई म्हणजे खऱ्या अर्थाने काँग्रेसचे निष्ठावान सैनिक आहेत.
काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या अत्यंत कठीण काळात सोनियाजींनी मुबंई काँग्रेसची धुरा भाईंकडे सोपवली आहे. अशा अवस्थेत काँग्रेस पक्षाला भक्कम करणं हे फार मोठं आव्हान भाईंसमोर आहे. भाईंमधला कडवट, आक्रमक, झुंजार कार्यकर्ता हे आव्हान पेलेल याची मला खात्री आहे. मुंबईतील काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांनी गटतट व स्वतःच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा विसरून पक्षासाठी भाईंना साथ देण्याची गरज आहे. खूप काळानंतर मुंबईला सर्वमान्य, आश्वासक चेहरा लाभला आहे. मुंबईतील सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला आणि मुंबईकर जनतेला खूप आनंद झाला आहे. अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाईंचे हार्दिक अभिनंदन.
भाईंच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त करुन भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी भाईंना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र.!!

राजेंद्र शेलार, सातारा
प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.
8999247187
9923406777

प्रतिक्रिया व्यक्त करा