प्रत्येकाने महाराजांचे विचार आचरणात आणले पाहिजेत, तीच खरी शिवजयंती ठरेल – अजय तपकिरे
सावंतवाडी :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अर्चना फाऊंडेशनच्यावतीने सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये ‘शिवकालीन शस्त्रास्त्रे व शिवरायांच्या प्रतिमां’ चे तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ‘स्वराज्य रक्षक संभाजीराजे’ या मालिकेतील बहिर्जी नाईक यांची अजरामर भूमिका करणारे प्रसिद्ध अभिनेते अजय तपकिरे यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शिवराय सांगायला सोपे आहेत, शिवराय ऐकायला सोपे आहेत, शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे, पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे. आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल तोच खरा शिवभक्त असेल. त्यामुळे शिवजयंती साजरी करताना शिवरायांचे विचार आत्मसात करा, असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेते अजय तपकिरे यांनी सावंतवाडी येथे व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कोकण प्रदेशाध्यक्षा सौ. अर्चना घारे-पारब, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हा बँकेचे संचालक व्हिक्टर डॉन्टस, माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ॲड. संदीप निंबाळकर, ॲड. नकुल पार्सेकर, राजू कामत, काका मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते नंदकुमार पाटील, पुंडलिक दळवी, सायली दुभाषी, रेवती राणे, संदीप घारे आदी मान्यवर उपस्थित होते.
हजारो तलवारीचे युद्ध एका वाघनखाने जिंकता येते. मात्र, ते वापरण्यासाठी अफाट बुद्धिमत्ता लागते. हे शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध करून सिद्ध केले. शिवाजी महाराजांकडे प्रचंड आत्मविश्वास होता. मॅरेथॉनच्या पठारावरील विजयाची बातमी देण्यासाठी ग्रीक सैनिक ४२ किमी. अंतर धावला आणि त्याने आपल्या राजाला आनंदाची बातमी देऊन आपले प्राण सोडले. तेव्हापासून सुरू झालेल्य मॅरेथॉनचे उदात्तीकरण केले जाते. मात्र, शिवाजी महाराज व त्यांचे मावळे सिद्धी जोहरच्या हल्ल्याला परतवून लावण्यासाठी अमावास्येच्या रात्री पावसामध्ये शत्रू पाठीवर घेऊन पन्हाळा गडापासून विशालगडापर्यंत न थांबता तब्बल ५२ किलोमीटर धावले, हा इतिहास खूप कमी लोकांना माहित आहे, हे आपले दुर्भाग्य आहे. म्हणूनच शिवाजी महाराजांचा इतिहास नवीन पिढीसमोर आला पाहिजे. शिवाजी महाराजांचे विचार घरोघरी पोहोचले पाहिजेत आणि प्रत्येकाने महाराजांचे विचार आचरणात आणले पाहिजेत, तीच खरी शिवजयंती ठरेल, असे मत अभिनेते अजय तपकीरे यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रास्ताविक सादर करताना सौ. अर्चना घारे म्हणाल्या, छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास आजच्या पिढीला कळावा तसेच आजच्या विद्यार्थ्यांना सोशल मीडियापासून मिळणारे ज्ञान पूर्णतः खरे नसते त्याऐवजी प्रत्यक्ष अनुभवानिष्ठ ज्ञान मिळावे यासाठी हे ऐतिहासिक वस्तू व चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. त्याचा लाभ सावंतवाडीकरांनी व शिवप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन अर्चना घारे यांनी केले.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ॲड. दिलीप नार्वेकर, ॲड. नकुल पार्सेकर, नंदकुमार पाटील, बबन साळगावकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी शिवप्रेमी व किल्ले गड संरक्षक सागर नाणोसकर, सागर परब, डॉ. संजीव लिंगवत, संदेश गोसावी, डॉ. कमलेश चव्हाण, अभिनेते नंदकुमार पाटील यांचा सत्कार अभिनेते अजय तपकरे यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन युवा पत्रकार शुभम धुरी यांनी केले.