सावंतवाडी :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांमध्ये शिवविचार रुजावेत व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने श्री निखिल नाईक व आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बाळा परब यांच्या संकल्पनेतून मागील वर्षापासून आरोस येथे शिवविचार सोहळा या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावर्षी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस येथे आरोस केंद्रा अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिली ते चौथी , पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी व आकारावी – बारावी अशा चार गटात स्पर्धा घेतली जाणार असून प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले सन्मानचिन्ह, प्रशस्ती पत्रक व रोख बक्षीस देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे तसेच स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागासाठी शिवकथांवर आधारीत पुस्तकही दिले जाणार आहे. यास्पर्धेचे परीक्षण लेखक, कवी व पत्रकार श्री दीपक पटेकर आणि तरुण भारत या वृत्तपत्राचे उपसंपादक व रंगकर्मी श्री प्रवीण मांजरेकर करणार आहेत.
शिवविचार सोहळ्याचे संपूर्ण आयोजन व नियोजन विद्याविहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस करत असून ; श्री निखिल नाईक ,श्री संदेश देऊलकर व देवेंद्र कुबल यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केलेली आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री जयंत जावडेकर हे उपस्थित राहणार असून ते विद्यार्थ्यांना स्पर्धापरिक्षांबाबत व करियर बाबत मार्गदर्शनही करणार आहेत.
अशी माहिती विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सदाशिव धुपकर यांनी दिली.