मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार धोरणाविरुद्ध भारतातील सर्व केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी १६ फेब्रुवारी २०२४ रोजी देशभर औद्योगिक संप आणि ग्रामीण बंदची हाक दिली आहे. त्याला महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष कैलास कदम आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी सक्रिय पाठिंबा दिला असून लोकशाही वाचविण्याच्या या लढ्यामागे ठाम उभे रहाण्याचे कामगारांना आवाहन केले आहे.
दरम्यान शेतकरी आंदोलन चिरडण्यासाठी दिल्ली सीमारेषेवर ड्रोनद्वारे केलेला अश्रुधूर आणि पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी निषेध केला आहे. केंद्र सरकारने कामगार आणि शेतकर्यांच्या हिताविरूध्द पाऊल उचलले आहे, त्याला प्रतिकार करण्यासाठी कामगार संघटनी लढा उभा केला आहे, त्याला कामगार नेते आमदार सचिन अहिर यांनी आपला पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्रातील इंटक प्रणित कामगार संघटनांनी आपापल्या उद्योगात निदर्शने आणि धरणे आंदोलनाद्वारे शेतकरी आणि कामगार हितविरोधी धोरणे राबविणार्या मोदी सरकारचा तीव्र निषेध करावा, असे आवाहन महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष कैलास कदम आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केले आहे.
या आवाहनानुसार महाराष्ट्रातील सर्व युनिट, कामगार संघटना, फेडरेशन यांनी आपापल्या उद्योगांसमोर निदर्शने आणि धरणे आंदोलन करून केंद्रीय कामगार संघटनेच्या बंदमध्ये सहभागी व्हायचे आहे.
कष्टकरी वर्गाच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी, शेती उद्योग आणि अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी, ठोस मागण्यांच्या पूर्ततेसाठी, भारतातील शेतकरी आणि कामगारवर्ग संघर्ष करत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती साठी, सार्वजनिक क्षेत्रातील खाजगीकरण निर्गुंतवणूक धोरण रद्द करा, चार कामगार संहिता मागे घ्या, तीन शेतकरी कायदे रद्द केले, पण शेती मालाला किमान आधारभूत किंमत निश्चित करा आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी आणि कामगार संघर्ष करित आहेत.
देशातील बंद एनटीसी गिरण्या त्वरित चालू करा आणि कामगार तसेच त्यांच्या कुटुंबीयांची गेल्या दोन वर्षांपासून चाललेली उपासमार संपुष्टात आणा, कामगार विरोधी चार लेबर कोड मागे घेण्याची अधिसूचना जारी करा, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटीकरण त्वरित थांबवा, लोकशाहीच्या मुलभूत तत्वांचे संरक्षण करा आदी मागण्यांसाठी १६ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १२ ते १ दरम्यान जेवणाच्या सुट्टीत सर्व कामगार संघटना एकत्रित येऊन तीव्र निदर्शने करणार आहेत. ग्रामिण पातळीवरील मोदी सरकार विरुद्धचा असंतोष जिल्हाधिकारी आणि शहरातील कामगार संघटना आपला निषेध कामगार आयुक्त यांच्याकडे नोंदवतील.
लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी, कामगार वर्गाचे खच्चीकरण थांबविण्यासाठी इंटकसह सर्व कामगार संघटना आणि कामगार वर्गाने हा निषेध दिन यशस्वी करा! असे महाराष्ट्र इंटकच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे
दिनांक १६ रोजी दुपारी १२ ते संध्या. ४ वा. पर्यंत आझाद मैदान येथे कामगार संघटना संयुक्त कृती समितीने आयोजित केलेल्या सभेला कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केले आहे.