You are currently viewing केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार धोरणाविरुद्ध १६ फेब्रुवारीला देशभर संप व आंदोलने

केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार धोरणाविरुद्ध १६ फेब्रुवारीला देशभर संप व आंदोलने

मुंबई :

 

केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार धोरणाविरुद्ध भारतातील सर्व केंद्रीय कामगार संघटना व शेतकरी संघटनांनी १६ फेब्रुवारी २०२४ रोजी देशभर औद्योगिक संप आणि ग्रामीण बंदची घोषणा केली आहे. या आव्हानानुसार महाराष्ट्रात देखील सर्व कामगार संघटना आपापल्या उद्योगात संप, मोर्चा, निदर्शने व धरणे अशा प्रकारची विविध आंदोलने करणार आहेत. हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस हरभजन सिंग सिद्धू यांच्या आव्हानानुसार महाराष्ट्रातील सर्व घटक कामगार संघटना आपापल्या उद्योगांमध्ये संप, मोर्चा, निदर्शने व धरणे आंदोलन करून हिंद मजदूर सभेच्या वतीने बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

कष्टकरी वर्गाच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी, शेती उद्योग आणि अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी, ठोस मागण्यांच्या पूर्ततेसाठी, भारतातील शेतकरी आणि कामगार संघर्षाच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती साठी, खाजगीकरण, सार्वजनिक क्षेत्रातील निर्गुंतवणूक, चार कामगार संहिता आणि तीन शेतकरी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी आणि कामगार संघर्ष करीत आहेत.

*गोदी कामगारांची निदर्शने*

भारतातील बंदर व गोदी कामगारांचा वेतन करार त्वरित करा, कामगार विरोधी चार लेबर कोड मागे घ्या, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटीकरण त्वरित थांबवा, लोकशाहीच्या मुलभूत तत्वांचे संरक्षण करा या मागण्यांसाठी १६ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १२ ते १ दरम्यान जेवणाच्या सुट्टीत ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली कर्नाक बंदर येथे मुंबई बंदरातील मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियन, मुंबई पोर्ट ट्रस्ट पेन्शनर्स असोसिएशन, फ्लोटीला वर्कर्स असोसिएशन, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समिती, मुंबई पोर्ट ट्रस्ट एस.सी. एस.टी. अँड ओ.बी.सी. वेल्फेअर असोसिएशन या सर्व कामगार संघटना एकत्रित येऊन तीव्र निदर्शने करणार असल्याचे मारुती विश्वासराव प्रसिद्धी प्रमुख मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड एम्प्लॉइस युनियन यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा