चेकपोस्टवर कर्मचार्यांना गाड्यांची तपासणी न करण्याचे तोंडी आदेश
बांदा प्रतिनिधी
गोव्यातून सिंधुदुर्गात विनाअट प्रवेश करण्याचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. पत्रादेवी चेकपोस्टवर गोव्यातून येणार्या वाहनांची तपासणी न करण्याचे तोंडी आदेश सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिले.
गोवा राज्याने काल रात्री १२ वाजल्यानंतर सर्व सीमा खुल्या केल्या होत्या. त्यामुळे सिंधुदुर्ग सीमा कधी खुल्या होतील असा प्रश्न निर्माण झाला होता. गोव्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी व नोंदणीही सुरू होती. अखेर वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर आज दुपारी १२ नंतर बांदा तपासणी नाक्यावर गोव्यातून सिंधुदुर्ग मध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी बंद करण्यात आली आहे. गोव्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांना आता विनाअट प्रवेश सुरू करण्यात आला आहे. सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सीमेवरील नाक्याला भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, तब्बल पाच महिन्यांच्या कालावधीनंतर सिंधुदुर्ग मधून गोवा व गोव्यातून सिंधुदुर्ग असा प्रवास विनाअट पूर्ववत सुरू झाला आहे. त्यामुळे गोव्यात रोजगारासाठी दररोज ये-जा करणाऱ्यांना आता सोपे होणार आहे.
अद्याप महाराष्ट्र शासनाच्यावतीने अधिकृत पत्रक मात्र काढण्यात आलेले नाही. संध्याकाळ पर्यंत याबाबत शासनस्तरावर अधिकृत निर्णय होईल असे सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी पत्रादेवी येथे तपासणी नाका भेटी दरम्यान सांगितले. यावेळी त्यांनी नाक्यावरील कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
गोवा राज्यात प्रवेश खुला करण्यात आल्याने सीमेवरील गोवा राज्याचे सर्व तपासणी नाके हटविण्यात आले आहेत.