*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी प्रो.डॉ.जी.आर.उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बाल राम*
दुडू दुडू धावे बालक राम
कोमल पद आरक्त श्याम
।। ध्रु ।।
पायी पैंजण रुणझुण बोले
कमल मुख कुंतल कुरळे
राजीव नेत्र शीतल दृष्टी
सात्त्विक भाव हास्य विरळे
तुझ्या दर्शने तुष्ट आत्माराम
।। 1 ।।
कुंडल डूले पद लालित्य
कंठी मोती माळ विराजित
कटी पितांबर विलसित
हेम मेखला कर विभूषित
रूप तुझे भासे मेघश्याम
।। 2 ।।
ओष्टद्वय विलग मुलायम
दंत पाकळ्या दाडीमा सम
मुखी स्मित रमणीय राम
ठुमक चाल प्रभू विराम
तुझे असणे मंगलधाम
।। 3 ।।
प्रो डॉ जी आर प्रवीण जोशी
नसलापुर बेळगाव
कॉपी राईट